‘मालगुडी डेज्’ : ‘दूरदर्शन’ ची लोकप्रिय मालिका, आर. के. लक्ष्मण यांनी काढले होते रेखाचित्रे, वाचा…

टीम AM : ‘मालगुडी डेज’ ही मालिका ‘दूरदर्शन’ वर तुफान लोकप्रिय झाली होती. आजच्या दिवशी 24 सप्टेंबर 1986 साली दूरदर्शनवर ‘मालगुडी डेज्’ या  लोकप्रिय मालिकेचा पहिला भाग दाखविण्यात आला होता. आर. के. नारायण यांच्या लघुकथांवर प्रकाशित पुस्तकावर आधारित, या मालिकेचे दिग्दर्शन शंकर नाग यांनी केले होते. ‘ऍस्ट्रॉनॉमर्स डे’, ‘लॉली रोड’ या संग्रहातल्या आणि काही नवीन अशा मिळून एकूण 32 गोष्टींचं संकलन ‘मालगुडी डेज्’ या पुस्तकात आहे.  

मालगुडीचं ते लहानसं गाव आणि तिथे घडणाऱ्या स्वामी, त्यांच्या मित्रांच्या गमती जमती आणि बालपणीचं दिवस आठवून अनेकांनीच आपलं बालपणही त्यांच्याशी जोडलं होतं. ‘मालगुडी डेज्’ च्या मुख्य पात्रांपैकी एक म्हणजे स्वामी, ज्याची भूमिका अभिनेता मंजुनाथ नायकर यांनी साकारली होती. स्वामीचे पात्र हे एका जिज्ञासू मुलाचे आहे. स्वामी धोतर, झब्बा, टोपी, हातात पाटी, पिशवी, शाळेचं दप्तर अशा एकंदर रुपात सर्वांसमोर यायचा. मंजुनाथ नायकर यांनी बालकलाकार म्हणून तब्बल 68 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यात अमिताभ बच्चन यांच्या ‘अग्निपथ’ मधील भूमिकेचा समावेश आहे.

‘मालगुडी डेज्’ या मालिकेसाठी नारायण यांचे बंधू प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी काढलेल्या रेखाचित्रांमुळे ती मालिका आणि ते पुस्तक यांच्या लोकप्रियतेत भरच पडली. लोकप्रिय झालेल्या या मालिकेचे काही वर्षांपूर्वी ‘मालगुडी डेज् रिटर्न’ या नावाने पुनप्रसारण देखील करण्यात आले होते. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये तयार करण्यात आलेल्या या मालिकेचे 39 भाग प्रसारित झाले होते.

‘ता ना ना, ता ना ना ना ना….. ता ना ना, ता ना ना ना ना’ हे स्वर आजही कानी पडले की दूरदर्शनच्या त्या सुवर्णकाळात मन रमून जाते. या ट्युनचे जनक व शास्त्रीय संगीतातील थोर दाक्षिणात्य संगीतकार लक्ष्मीनारायण वैद्यनाथन यांनी ‘मालगुडी डेज्’ च्या संगीताची जबाबदारी सांभाळली होती. 

शब्दांकन : संजीव वेलणकर