‘स्वाराती’ रुग्णालयात औषधांचा तुटवडा : गोरगरीब रुग्णांना आर्थिक फटका

टीम AM : स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे गोरगरीब रुग्णांचे हाल होत असून, त्यांना औषधं विकत घ्यावी लागत आहेत. खिशाला कात्री बसत असल्याने रुग्ण त्रस्त झाली आहेत.  गोरगरीब रुग्णांसाठी वरदान असलेल्या ‘स्वाती’ रुग्णालयात उपचारासाठी दररोज हजारो रुग्ण येतात. मात्र, येथे आलेल्या रुग्णांना बाहेरून औषधं घेण्याचे सांगितले जाते. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत असून आर्थिक फटकाही त्यांना सहन करावा लागत आहे.

गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा व्यवस्थित मिळाव्यात आणि नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी सरकार कोट्यावधी रुपये खर्च करत आहे. गोरगरिबांना कोणत्याही प्रकारे त्रासाला सामोरे जावे लागू नये, त्यांच्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत, यासाठी शेकडो प्रकारच्या गोळ्या – औषधांची खरेदीही केली जाते. मात्र, ‘स्वाराती’ त अनेक प्रकारच्या गोळ्या – औषधं उपलब्ध नाहीत. सध्या औषधं उपलब्ध नसल्याने बाहेरून औषधं विकत घेण्याचा सल्लाही येथील डॉक्टर, कर्मचारी यांच्याकडून दिला जातो.

काही दिवसांपासून ‘स्वाराती’ रुग्णालय सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. एकतर डॉक्टर, कर्मचारी यांची संख्या कमी, त्यात औषधांचा तुटवडा. यामुळे गोरगरीब जनता त्रस्त झाली आहे. ‘स्वाराती’ प्रशासनात नियोजनाचा अभाव असल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.

औषधं उपलब्ध करुन द्यावीत

सध्या मोठ्या प्रमाणात वातावरणात बदल झाले आहेत. त्यामुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहे. ‘स्वाराती’ रुग्णालयात रुग्णांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात मोलमजुरी करणाऱ्या गोरगरिबांचा समावेश आहे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांमध्ये नाराजी आहे. मोफत उपचार मिळावे म्हणून गोरगरीब जनता या रुग्णालयात येते. मात्र, औषधं नसल्याने हजारो रुपयांचे औषधं विकत घेण्याचे प्रसंग गोरगरीब जनतेवर येत आहे. ‘स्वाराती’ रुग्णालय प्रशासनाने तातडीने औषधं उपलब्ध करुन द्यावीत, अशी मागणी सामान्य जनतेकडून होत आहे.