अंबाजोगाईत ढोल – ताशांच्या गजरात गणरायाला निरोप : गणेश भक्तांत जल्लोषाचे वातावरण

टीम AM : ढोल ताशांच्या गजरात हिंदी – मराठी गाण्यावर ठेका धरत ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात गणरायाला अंबाजोगाईत भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. दरम्यान, गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस प्रशासनाच्या वतीने तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुठलाही अनुचित प्रकार न घडता गणेश विसर्जनाची मिरवणूक उत्साहात, शांततेत पार पडली.

अंबाजोगाई शहरात गणेश विसर्जनाच्या दिवशी काल दूपारपासूनचं सर्व गणेश मंडळांच्या मिरवणूकीस प्रारंभ झाला. एकीकडे ढोल – ताशांचा गजर तर दुसरीकडे मराठी – हिंदी गाण्यावर विद्युत झोतात गणेश भक्तांनी ठेका धरला होता. सर्वच गणेश मंडळांच्या समोर गणेश भक्तांमध्ये उत्साह दिसून येत होता. अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फेटे आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. यंदाच्या मिरवणुकीत प्रत्येक गणेश मंडळांत मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. ढोल पथकात बहुतांश मुली दिसून येत होत्या. अगदी गणेश भक्तांसोबत त्याच उत्साहाने ढोल वाजवत मुलींनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. 

मिरवणुकीत शहरातील सर्वच गणेश मंडळांनी सहभाग नोंदविला होता. गणेश मुर्तींसमोर उत्कृष्ट, आकर्षक देखावे सादर केले होते, जे सर्वांचेच लक्ष केंद्रित करत होते. मिरवणूकीसमोर फटाक्यांची आतिषबाजी, नृत्य, झांज, लेझिम पहाण्यासाठी अंबाजोगाईकरांनी एकच गर्दी केली होती. मिरवणूकीचे हे क्षण टिपण्यासाठी मोबाईलच्या कॅमेऱ्यांचा लखलखाट सुरू होता. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंतचा रस्ता गर्दीनं व्यापून गेला होता. उत्साहात, जल्लोषात, भक्तीमय वातावरणात आपल्या लाडक्या ‘बाप्पाला’ अंबाजोगाईकरांनी निरोप दिला.

वाहतूकीत बदल

गणेश विसर्जनानिमीत्ताने वाहतूकीस अडथळा होवू नये, यासाठी काल दुपारपासूनचं शहरातील वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले होते. तसेच एसटी महामंडळाकडून बसस्थानकाची व्यवस्था यशवंतराव चव्हाण चौक व भगवानबाबा चौक येथे करण्यात आली होती. नगरपरिषदेच्या वतीनेही विसर्जनाच्या ठिकाणी सर्व सुविधा गणेश मंडळांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या.