विद्यमान आमदारांनी स्वत:चा आणि गुत्तेदार कार्यकर्त्यांचा विकास केला : भाई दिपक केदार

विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील जनता विद्यमान आमदारांना घरचा रस्ता दाखवणार : भाई केदार

टीम AM : केज मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून राखीव असल्याने मागासवर्गीयांचा किती विकास झाला ? हे सर्वांनाच माहिती आहे. विद्यमान आमदारांनी आणि त्यांच्या सासऱ्यांनी केवळ स्वतःचा आणि गुत्तेदार कार्यकर्त्यांचा विकास करून मागासवर्गीयांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. आज छोट्या छोट्या शहरांनी चांगले रूप धारण केले असून केज मतदारसंघातील केज व अंबाजोगाई हे शहरं भकास करून टाकले आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत केज मतदारसंघातील सुजाण जनता विद्यमान आमदारांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. केज मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचे ऑल इंडिया पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष भाई दिपक केदार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बातचीत करताना सांगितले.

अंबाजोगाई तालुक्यातील आज असंख्य युवा कार्यकर्त्यांचा ऑल इंडिया पँथर सेनेत प्रवेश झाला आहे. त्यासाठी ते अंबाजोगाईत आले होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. 

पुढे बोलताना भाई दिपक केदार म्हणाले की, केज मतदारसंघात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे मतदारसंघातील शेतकरी हवालदिल झाला आहे. ‘त्या’ शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आमदारांना वेळ नाही, त्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी आमदारांनी साधी मागणी राज्य सरकारकडे केली नाही, असा आरोप दिपक केदार यांनी केला.  

केज मतदारसंघातील येवता या गावात शाळेत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्याला चॉकलेट चोरले म्हणून बांधून मारहाण केली. ही घटना संबंध राज्यात गाजत असताना स्वतःला मागासवर्गीय म्हणून घेणाऱ्या आमदारांनी साधी त्या चिमुकल्याची भेटही घेतली नाही. केज मतदारसंघात मागासवर्गीयांवर होणाऱ्या अत्याचारासंबधी आमदार साधा ‘भ्र’ शब्द काढत नाहीत. मागासवर्गीयांचा विकास नाही, दलित वस्तीचा फंड इतरत्र वळविला जातो. त्याकडेही आमदार जाणूनबुजन दुर्लक्ष करतात. तर या मागासवर्गीय आमदार मागासवर्गींयासाठी काय कामाच्या ? असा सवालही यावेळी भाई दिपक केदार यांनी उपस्थित केला.

केज मतदारसंघात मुस्लिम बांधव सुरक्षित नाहीत, दलित बांधव सुरक्षित नाहीत. मराठा आरक्षणावर आमदार बोलत नाहीत. केज मतदारसंघाच्या विकासावर कधी बोलत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना आपला पराभव दिसून येत असल्याने आमदार फंडांचे आमिष दाखवून केज मतदारसंघातील कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने सुरू आहे. केज मतदारसंघातील सुजाण जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नसून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही, असेही दिपक केदार यावेळी बोलताना म्हणाले. 

केज मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार : भाई दिपक केदार

केज मतदारसंघात ‘एमआयडीसी’, उद्योग धंद्यांची साधने नसल्याने असंख्य युवकांच्या हाताला काम नाही. येथील अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा प्रश्न असो की, बुट्टेनाथ साठवण तलावाचा प्रश्न असो, गेल्या कित्येक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित आहे. केज मतदारसंघातील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही वचनबध्द असून जनतेने आम्हाला मतदानरुपी आशीर्वाद दिल्यास केज मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून दाखवू, अशी ग्वाही भाई दिपक केदार यांनी बोलताना दिली. यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे अक्षय भूंबे, जीवन गायकवाड, अमर वाघमारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.