टीम AM : अंबाजोगाईकरांची जीवनवाहिनी असलेल्या मांजरा धरणात जलसंचय वाढत असल्याने धरणातील एकूण पाणीसाठा वाढत आहे. मांजरा धरणाचा जिवंत पाणी साठा 92. 43 टक्क्यांच्या घरात पोहचला आहे. यामुळे वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने अंबाजोगाईकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
पावसाने पाठ फिरवल्याने गेल्या वर्षी मांजरा धरण भरले नाही. त्यामुळे यंदा पुरेसा पाऊस पडणार का ? मांजरा धरण भरणार का ? याकडे तमाम अंबाजोगाईकरांचे लक्ष लागले होते. धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे मांजरा धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यातच धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसात पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे धरणात दररोज एक ते दोन टक्क्यांची वाढ होत आहे.
धरणातील एकूण पाणी पातळी वाढली आहे. पाऊस असाच राहिला तर मांजरा धरण लवकरच भरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोणत्याही क्षणी विसर्ग
बीड जिल्ह्यातील मांजरा धरण 92 टक्क्यांहून अधिक भरलं आहे. आवक वाढल्यास कोणत्याही क्षणी धरणातून पाणी सोडण्यात येईल, असं पाटबंधारे विभागाचे धनेगाव इथले शाखा अधिकारी सुरज निकम यांनी सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर मांजरा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.