टीम AM : अंबाजोगाईत पावसाने गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. सतत रिमझीम पावसामुळे गेल्या दोन दिवसापांसून ढगाळ वातावरण पहावयास मिळत आहे. त्यातच कालपासून पावसाचा जोर आणखी वाढला असून आज रविवारी संततधार सुरुच आहे. त्यामुळे शेतातील कामे ठप्प झाली तर काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, शहरातील मंगळवार पेठ भागात नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अंबाजोगाईत 30 ऑगस्ट पासून पावसाचा जोर वाढला आहे. पावसाच्या सरी कमी – अधिक प्रमाणात सुरूच आहेत. अंबाजोगाईत आतापर्यंत 632.4 मिलीमिटर पाऊस पडला असून तालुक्यात 60 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. अंबाजोगाई शहरासह तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पिकांवरील रोगराईला आमंत्रण देत आहे.
अंबाजोगाईत काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. काही वेळ पावसाचा जोर थोडा वाढतही आहे. त्यातच पावसामुळे हवेत गारवा वाढला असून नागरिक उबदार कपडयांचा वापर करीत आहेत. अंबाजोगाई शहरासह तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचले आहे. विशेषत: सखल भागात पाणी साचल्याने तेथून नागरिकांना चालताना कसरत करावी लागत आहे.