‘त्या’ निधीसाठी मोदी आणि साठे यांचेच प्रयत्न : योगेश्वरी मंदिराची शासनस्तरावर कुठेच नोंद नाही, वाचा… 

टीम AM : योगेश्वरी देवल कमिटीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष राजकिशोर मोदी आणि माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या अथक प्रयत्नांमुळे योगेश्वरी देवी मंदिर व परिसरातील विकासकामांसाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती देवल कमिटीचे सचिव प्रा. अशोक लोमटे यांनी दिली आहे. 

योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने मंदिर परिसरात आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला नवनिर्वाचित उपाध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, सचिव प्रा. अशोक लोमटे, सहसचिव संजय भोसले, राजपाल भोसले, हंसराज देशमुख यांच्यासह आदी सदस्यांची उपस्थिती होती. 

पत्रकार परिषद

या पत्रकार परिषदेत बोलताना प्रा. अशोक लोमटे यांनी सांगितले की, धर्मादाय आयुक्त, बीड यांनी शासनाच्या सर्व नियम व अटींच्या अधिन राहुन योगेश्वरी देवल कमिटीच्या नविन विश्वस्त मंडळाची निवड केली आहे. योगेश्वरी देवल कमिटीच्या नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाने काही धोरणात्मक निर्णय घेतले असून त्याची माहिती आम्ही आपल्याला देत आहोत. विश्वस्त मंडळाने देवीच्या भक्तांसाठी दररोज महाप्रसादाची सोय केली आहे. त्यासोबतच मंदिराचे उत्पन्न वाढावे, यासाठी दररोज सकाळी प्रथम महापूजा करणाऱ्या भक्तांकडून एक हजार रुपये व पैठणी साडी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मंदिराच्या उत्पन्नात महिन्याकाठी 20 ते 25 हजार रुपयांची वाढ झाली आहे. याची रितसर पावती महापूजा करणाऱ्या भक्ताला दिली जाते. तसेच अभिषेक करण्यासाठी 50 रुपये फी आकारण्यात येत असून या माध्यमातून देखील महिन्याकाठी 15 ते 20 हजार रुपये उत्पन्न देवल कमिटीस होत आहे. आजमितीस देवल कमिटीकडे सोने – चांदीच्या दागिन्यांसह 10 लाख रुपये जमा आहेत, असे लोमटे यांनी सांगितले. 

विजेचे बील शून्यपर्यंत आणण्यात यश

पुढे बोलताना लोमटे म्हणाले की, मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून 120 बॅटरी धूळ खात पडल्या होत्या. त्या रितसर निविदा मागवून दुरुस्त केल्या आहेत. त्यासोबतच सोलारची पावर 15 वरुन 20 वॅट केल्यामुळे विजेचे बील शून्यपर्यंत आणण्यात यश आले आहे. मंदिराची स्वच्छता दर दोन तासाला होत असल्याने मंदीराचे पावित्र्य अबाधित राहत आहे, असेही लोमटे यांनी सांगितले. 

शासनस्तरावर नोंद नाही

शासनस्तरावर योगेश्वरी मंदिराची नोंद कुठेच व कोणत्याच वर्गात करण्यात आली नव्हती. आगामी काळात शासनाच्या तीर्थक्षेत्र तथा पर्यटन विभागाकडे (वर्ग -1) मंदिराची नोंद करून घेण्यासाठी नवीन विश्वस्त मंडळ प्रयत्नशील असणार आहे. अंबाजोगाई शहर हे तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जावे, त्या माध्यमातून शहरातील व्यापार, रोजगार वाढावा यासाठी नवीन विश्वस्त मंडळ आगामी काळात प्रयत्नशील राहणार आहे. 

100 कोटींचा ‘मास्टर प्लॅन’ : मोदी

योगेश्वरी देवल कमिटीचे सन 2014 पासून लेखापरिक्षण केलेले नाही. 2014 मध्ये लेखापरिक्षण झाले आहे. सदरिल लेखापरिक्षणामध्ये अनेक गंभीर दोष दाखवलेले आहेत. सदरिल दोष दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू व पुढील सर्व वर्षाचे लेखापरिक्षण आम्ही लवकरच पुर्ण करून घेणार आहोत. लेखापरिक्षण दुरूस्ती करण्यासाठी आम्ही सर्वांनी सतत पाठपुरावा केला. सर्व रेकॉर्ड देण्यासाठी आम्ही तगादा लावला असता, सर्व कर्मचारी एकदम राजीनामे देवून घरी बसले आहेत. तसेच तत्कालीन सचिव, कोषाध्यक्ष यांनी आजपर्यंत कोणतेही रेकॉर्ड, चाव्यांची माहिती दिलेली नाही. त्यांनी ती लवकर द्यावी म्हणजे लेखापरीक्षण लवकर पूर्ण करून घेण्यात येईल. मंदिर विकास कामाचा पुढील 30 वर्षांसाठीचा 100 कोटींचा ‘मास्टर प्लॅन’ आराखडा तयार करण्याचे काम वास्तुविशारद आकाश कऱ्हाड यांच्या सल्यानुसार सुरू असून, त्यासाठी विश्वस्त मंडळाच्या वतीने शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.