टीम AM : नगरपरिषदेच्या कंत्राटी स्वच्छता कामगारांचे थकित दोन महिन्यांचे वेतन न मिळाल्याने त्यांनी अंबाजोगाईत दोन दिवसांपासून ‘कामबंद’ आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत थकित वेतन मिळत नाही आणि उर्वरित ‘पीएफ’ कंत्राटदार कंपनी देत नाही, तोपर्यंत कामावर न येण्याचा निर्णय स्वच्छता कामगारांनी घेतला आहे. दरम्यान, स्वच्छता कामगारांच्या या ‘कामबंद’ आंदोलनामुळे अंबाजोगाईत स्वच्छतेचे ‘तीन तेरा’ वाजले असून गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
अंबाजोगाई शहरातील विविध भागात नियमित स्वच्छता करण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छतेचे कंत्राट एका खासगी कंपनीला दिले आहे. गेल्या काही वर्षांपासून या कंत्राटदाराच्या माध्यमातूनच शहरातील स्वच्छता करण्यात येते. ही स्वच्छता करण्यासाठी कंत्राटदाराने काही खाजगी कामगारांना कंत्राटी तत्वावर कामावर घेतले आहे. त्यांच्या मार्फत शहरातील विविध प्रभागात स्वच्छता करण्यात येते. परंतू, गेल्या दोन महिन्यापासून संबंधित कामगारांना त्यांच्या कामाचे पैसे न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शिवाय कंत्राटदाराने त्यांच्या ‘पीएफ’ चे पैसेही जमा केले नाहीत. त्यामुळे या कामगारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत थकित वेतन अदा केले जात नाही तोपर्यंत ‘कामबंद’ आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.
अंबाजोगाईत घाणीचे साम्राज्य
नगरपरिषदेच्या कंत्राटी स्वच्छता कामगारांनी थकित वेतनासाठी गेल्या दोन दिवसांपासून ‘कामबंद’ आंदोलन सुरू केले आहे. दोन दिवसांपासून कामगार कामावर न आल्याने घंटागाड्याही बंद आहेत. त्यामुळे शहरातील विविध प्रभागात कचऱ्याची विल्हेवाट न लागल्याने, नालीसफाई न झाल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपरिषद प्रशासनाने लवकर या कामगारांचे थकित वेतन अदा करावे व शहरातील स्वच्छता पुर्ववत सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.