‘भारत बंद’ : अंबाजोगाईत राजकीय पक्ष – संघटना रस्त्यावर, वाचा… 

टीम AM : अनुसूचित जाती आणि जमाती आरक्षणातील क्रिमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात देशभरातील विविध संघटनांनी आज (21 ऑगस्ट) ‘भारत बंद’ ची हाक दिली होती. दलित आणि आदिवासी संघटनांनी हा बंद पुकारला होता. एससी, एसटी अंतर्गत वर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारला असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि त्याविरोधातच ही ‘भारत बंदची’ हाक देण्यात आली. अंबाजोगाई शहरातही ‘भारत बंद’ चे पडसाद उमटले. 

‘भारत बंद’ साठी आज सकाळी 10 वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंबेडकरी तरुण आणि विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी एकत्रित आले. त्यांनी शहरातून भव्य अशी मोटारसायकल रॅली काढत बंदचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनालाही अंबाजोगाईतील सर्व व्यापारी वर्गाने प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली. 

यावेळी उपजिल्हाधिकारी यांना विविध राजकीय पक्षांच्या, संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी परिसरात कार्यकर्त्यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राजकीय पक्षांचे, संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, ‘भारत बंद’ च्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील मुख्य चौकात पोलीस तैनात करण्यात आले होते.