स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्थेत विशेष लेखा परीक्षकांना आढळली आर्थिक अनियमितता : पत्रकार परिषदेत माजी संचालकांची माहिती
टीम AM : येथील स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित अंबाजोगाई / परळी या संस्थेतील आर्थिक अनियमितता प्रकरणी दोषींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, या मागणीसाठी संस्थेचे माजी चेअरमन, संचालक व सभासदांनी सोमवार, दिनांक 5 ऑगस्ट 2024 पासून सहाय्यक निबंधक कार्यालय, अंबाजोगाई येथे आमरण उपोषण सुरू केले आहे, अशी माहिती माजी संचालक व सभासदांनी मंगळवार रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे. आज सदरील उपोषणाचा तिसरा दिवस होता.
याप्रकरणी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना माजी चेअरमन भगवान महिपती दराडे यांनी सांगितले की, माझ्यासह इतर सात जण ज्यात माजी संचालक आणि सभासद यांचा समावेश आहे. आम्ही रविवार रोजी पासून स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित अंबाजोगाई / परळी आमरण उपोषणाला बसलो आहोत. पुढे हे आंदोलन साखळी पद्धतीने सुरू राहणार आहे. आमच्या आंदोलनस्थळी ज्येष्ठ नेते ॲड. अनंतराव जगतकर यांनी भेट दिली आहे. आमचा प्रश्न समजून घेत याप्रकरणी तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, याबाबत प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी त्यांचे बोलणे झाले आहे, असे दराडे यांनी सांगितले.
प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखून दोंषीवर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा व संस्थेचे आर्थिक नुकसान भरून काढून सभासदांचे भाग परत करावेत, या मागणीसाठी माजी चेअरमन भगवान दराडे, भगवान गडदे, संजीव उमाप, सर्जेराव काशिद, वैजनाथ आंबाड, विनायक चव्हाण, श्रीमती शैला गणपतराव जाधव व श्रीमती रेखा चंद्रकांतराव टाक या आठ माजी चेअरमन, संचालक व सभासदांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या. अंबाजोगाई / परळीच्या सभासद बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.