केज विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिल्यास निवडणूक लढविणार
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीद्वारे बीड जिल्ह्यात 10 कोटींची मदत
टीम AM : केज मतदारसंघात ग्रामीण भागात रस्ते नाहीत, ‘एमआयडीसी’ नाही, युवकांच्या हाताला काम नसल्याने असंख्य जण पुणे – मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन आपली उपजीविका भागवित आहेत. मतदारसंघात अजूनही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. केज मतदारसंघात कुठे झालाय विकास ? असा प्रश्न उपस्थित करीत शिवसेना पक्षाने [ शिंदे गट ] मला उमेदवारी दिल्यास नक्कीच केज विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे समन्वयक रमेश राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अंबाजोगाई येथील शासकीय विश्रामगृहात आज दिनांक 6 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे [शिंदे गट] अर्जुन वाघमारे, गजानन मुडेगावकर, ऋषिकेश लोमटे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेत बोलताना रामहरी राऊत म्हणाले की, केज मतदारसंघातील मी रहिवासी असून गेल्या काही वर्षांपासून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचा राज्यातील गोरगरीब जनतेला मोठ्या प्रमाणात लाभ झाला असून आतापर्यंत या योजनेद्वारे जवळपास 36 हजार रुग्णांना 301 कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातही 10 कोटी रुपयांची आर्थिक मदत रुग्णांना या योजनेद्वारे करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच असून आता नवजात बालकांना आणि अपघात झाल्यास तातडीने 1 लाख रुपयांची मदत संबंधित गोरगरीब रुग्णांना करण्यात येत आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेची माहिती सर्वसामान्य जनतेला उपलब्ध होण्यासाठी ‘आरोग्य वारी आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्यात येत आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेत बीड जिल्ह्यातील बहुतांश रुग्णालय असून या रुग्णालयात जाऊन रुग्णांनी आपला उपचार करून घेण्याचे आवाहनही राऊत यांनी यावेळी केले.
केज विधानसभेसाठी उमेदवारी देण्याची मागणी करणार : गजानन मुडेगावकर
केज विधानसभेची निवडणूक लवकरच होणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून [ शिंदे गट] सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आणि केज मतदारसंघात आरोग्याचे उपक्रम राबविणारे रामहरी राऊत यांना उमेदवारी देण्याची मागणी आम्ही पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहोत. पक्षानं उमेदवारी दिल्यास केज विधानसभेची निवडणूक आम्ही लढणार असल्याचे मुडेगावकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.