टीम AM : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील कडा येथे एका गोदामात भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 13368 किलोचा साठा धाड टाकून जप्त करण्यात आला आहे. या मालाची किंमत 11 लाख 85 हजार 68 रूपये होती. हि कारवाई जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनात, तसेच छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गायकवाड यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या आदेशाने राबविण्यात आली.
मागील तीन दिवसांपासून याबाबत गोपनीय पद्धतीने मोहीम राबविण्यात आली होती. या अंतर्गत बीड, अहमदनगर आणि धाराशिव येथे आज पहाटे धाड टाकून कार्यवाही करण्यात आली आहे.
बीड – अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या गोदामात भेसळयुक्त दुध तयार करण्यात येत होते. या ठिकाणी दूध तयार करण्यासाठी लागणारे 13368 किलो भेसळ साहित्य जप्त करण्यात आले. दुध भेसळ करण्याचे काम बऱ्याच दिवसांपासून सुरू असल्याचे धाड टाकताना लक्षात आले. ही कारवाई अन्न सुरक्षा प्रशासन व पोलिसांनी रविवारी सकाळी केली. या धाडीमध्ये एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित गोदामाला अन्न व औषध प्रशासन विभागाने पुढील आदेशापर्यंत सील केले आहे.