अपघात विभागातील डॉक्टरांची संख्या वाढविण्याचे आदेश
अंबाजोगाई : बीडसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णांसाठी वरदान असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील समस्यांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आ. नमिता मुंदडा यांनी सोमवारी रुग्णालय प्रशासनासोबत बैठक घेतली. यावेळी आ. मुंदडा यांनी रुग्णालायातील गैरसोयींबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.
स्वाराती रुग्णालयातील अपघात विभागात रुग्णांची नेहमीच गर्दी असते. अत्यवस्थ रुग्णांना सर्वप्रथम अपघात विभागातच दाखल केले जाते. परंतु, या ठिकाणी डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी आ. नमिता मुंदडा यांच्याकडे केल्या होत्या. त्यामुळे आ. मुंदडा यांच्या आदेशाने सोमवारी स्वाराती रुग्णालयात बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीला ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, अधीक्षक डॉ. राकेश देशमुख, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख आणि कर्मचारी प्रतिनिधी हजर होते. या बैठकीत रुग्णालयातील सर्व समस्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आ. नमिता मुंदडा यांनी अपघात विभागातील डॉक्टरांची संख्या वाढविण्याची सूचना केली. तसेच, सुटीच्या दिवशी या ठिकाणी कनिष्ठ निवासी डॉक्टर पूर्णवेळ उपलब्ध करावेत असेही सांगितले. सध्या रुग्णांची संख्या रुग्णालयाच्या क्षमतेपेक्षा अधिक झाल्याने अनेक रुग्णांना जमिनीवर झोपविण्यात येत आहे. हा प्रकार बंद करून रुग्णांना आरामदायी गाद्या आणि स्वच्छ ब्लँकेट उपलब्ध करून द्यावेत, मला एकही रुग्ण जमिनीवर झोपलेला दिसला नाही पाहिजे अन्यथा माझ्याशी गाठ आहे असा इशारा आ. मुंदडा यांनी दिला. त्यासोबतच सर्व रक्त तपासण्या रुग्णालयातच तत्काळ करण्यात याव्यात आणि त्यांचे रिपोर्टही त्वरित देण्यात यावेत, एकही रुग्णाला रक्त तपासणीसाठी बाहेर पाठवू नका, काही डॉक्टर, रक्त तपासणी खाजगी प्रयोगशाळा आणि रिक्षाचालक यांचे संगनमत मोडीत काढा. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी यांनी रुग्णांना अपमानस्पद वागणूक न देता त्यांच्याशी आत्मीयतेने वागावे. रुग्णालयातील सर्व डॉक्टर कामकाजाच्या वेळेत पूर्णवेळ रुग्णालयात उपलब्ध असावेत, १०८ रुग्णवाहिकेला रुग्णालय परिसरातच थांबू द्यावे, रुग्णांचे डायलिसीस नियमित व्हावे, रुग्णालयातील अपघात विभागासह सर्व वार्डातील बीपी उपकरणे, इसीजी मशीन, व्हेन्टीलेटर मशीन आदी उपकरणे नेहमीच सुस्थितीत ठेवावीत अशा सूचना आ. मुंदडा यांनी केल्या.
तसेच, रुग्णालय परिसरातील उपहारगृहाच्या निविदा खुल्या पद्धतीने काढाव्यात, जेणेकरून स्पर्धेतून चांगल्या व्यक्तीकडे उपहारगृह जाईल आणि वैद्यकीय विद्यार्थी, नागरिकांना उत्कृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ मिळतील असेही त्या म्हणाल्या. त्यासोबतच रुग्णालय प्रशासनालाही काही अडचणी किंवा मागणी असतील तर त्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. यावेळी त्यांच्यासमवेत नगरसेवक शेख रहीम,पं.स. उपसभापती तानाजी देशमुख, ॲड. संतोष लोमटे, सारंग पुजारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
..तर जनता दरबार बोलविणार : आ. नमिता मुंदडा
मतदार संघातील सर्व सामान्य माणूस हा आमचे दैवत आहे, त्यांना कोणताही त्रास होऊ नये याची रुग्णालय प्रशासनाने दक्षता घ्यावी. बैठकीतील आदेश आणि सूचनांवर योग्य अंमल न झाल्यास आणि रुग्णांची ससेहोलपट कायम राहिल्यास एक महिन्यानंतर याच ठिकाणी जनता दरबार बोलाविला जाईल आणि त्यावेळी रुग्णालय प्रशासनाला सर्व सामान्यांसमोर जाब द्यावा लागेल असा इशारा आ. मुंदडांनी दिला.
माझ्यासोबतच्या कार्यकर्त्यांनाही अडवा : नंदकिशोर मुंदडा
अपघात विभागासारख्या संवेदनशील ठिकाणी रुग्णाभोवती नेहमीच नातेवाईकांचा गराडा पडलेला असतो. त्यामुळे रुग्णावर योग्य उपचार करणेदेखील डॉक्टरांना दुरापास्त होऊन जाते. ही परीस्थिती बदलली पाहिजे. एकापेक्षा अधिक नातेवाईकांना रुग्णाजवळ थांबू देऊ नका. भेटायला येणाऱ्यांच्याही संख्येवर आवर घाला. वेळप्रसंगी माझ्यासोबतच्या कार्यकर्त्यांनाही सुरक्षा रक्षकांनी अडवावे असे आवाहन करत नंदकिशोर मुंदडा यांनी बदलाची सुरुवात स्वतःपासून करणार असल्याचे संकेत दिले.
समस्यांचे प्राधान्याने निराकरण केले जाईल : डॉ. सुधीर देशमुख
अपघात विभागातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची संख्या त्वरित वाढविण्यात येईल, सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या देखील रुग्णालयातच करण्यात येतील. मागील काही वर्षात रुग्णांचा स्वारातीकडे ओढा वाढला आहे. मंजूर खाटांची संख्या साडेपाचशे असताना सध्या रुग्णालयात जवळपास हजार रुग्ण आहेत. त्यामुळे रुग्णालयावर ताण येत आहे. तरीही आम्ही सर्व रुग्णांना योग्य ती सेवा देऊत. सर्व समस्यांचे प्राधान्याने निराकरण केले जाईल असे देशमुख यांनी सांगितले.