डोंगर तुकाईचा धबधबा पाहिलाय का ? : पर्यटकांना घालतोय भुरळ, वाचा… 

अंबाजोगाईचा पर्यटन विकास रखडला

टीम AM : अंबाजोगाई शहर हे शिक्षणासोबतच अध्यात्मिक आणि पौराणिक शहर आहे. शहरातील विविध भागात पौराणिक मंदिरे असून या मंदिरांचा वेगळा असा इतिहास आहे. या मंदिरांच्या अवतीभवती पर्यटकांना खुणावणारे असे अनेक स्थळे असल्याने त्या ठिकाणी जाण्याचा मोह आवरता येत नाही. शहरातील असेच एक स्थळ, डोंगर तुकाईतील धबधबा. सध्या पर्यटकांचे आकर्षण या धबधब्याकडे होत असल्याने धबधबा पाहण्यासाठी हौसी पर्यटक जात आहेत आणि पर्यटनाचा मनमुराद आनंद घेत आहेत.

अंबाजोगाई शहराच्या उत्तरेला बालाघाट डोंगराच्या रांगा आहेत. शहरापासून तीन किलोमीटर अंतर असलेल्या मांडवा रोडवर निसर्गरम्य परिसरात डोंगर तुकाईचे मंदिर आहे. या मंदिराच्या लगतच आकर्षक असा धबधबा आहे. यंदा पाऊस काही प्रमाणात झाल्याने या परिसरात हिरवीगार चादर पसरली आहे. डोंगर तुकाईच्या मंदिराकडे जाण्यासाठी डोंगर उतरून जावे लागते. त्यासाठी दगडी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. डोंगरावरून पडणाऱ्या धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी व कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पर्यटक जात आहेत. धबधब्याचे पाणी 30 फुट उंचावरून पडत असल्याने पाण्याचा खळखळणारा आवाज मनाला निश्चितच आनंद देवून जातो. पावसाने या परिसरात अनेक प्रकारची हिरवीगार झाडी आणि गवत आले असल्याने त्याचे दृश्य कोणीही कॅमेऱ्यात टिपल्याशिवाय राहत नाही.

डोंगर तुकाईच्या या निसर्गरम्य परिसरात असलेला धबधबा पाहण्यासाठी अनेक पर्यटक जातात‌. पण काहीजण तेथे जाण्याचा मार्ग खडतर असल्याने जाण्याचेही टाळतात. त्या ठिकाणी दोन व चार चाकी वाहने जात नाहीत. डोंगर उतरण्याचे थोडे अवघड असल्याने लहान मुले व महिला तिकडे जाण्याचे टाळतात.

रस्ता करण्याची मागणी

निसर्गरम्य डोंगर तुकाई मंदिर व धबधबा पाहण्यासाठी शासनाने त्वरित नवीन रस्ता करावा, या भागात पर्यटन स्थळाची‌ निर्मीती करावी, अशी‌‌ मागणी‌ पर्यटकांच्या वतीने करण्यात‌ येत आहे.

पर्यटन विकास रखडला

अंबाजोगाई शहरात अनेक ठिकाणी निसर्गरम्य स्थळे असून या ठिकाणी पर्यटकांसाठी सोयी उपलब्ध करून दिल्यास निश्चितच पर्यटन विकासाला चालना मिळेल. वन विभागाच्या वतीने काही‌ ठिकाणी‌ तसा प्रयत्न झाला आहे, परंतू शासनाकडून ठोस पावले उचलली नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून अंबाजोगाई शहराचा पर्यटन विकास रखडला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी या विषयाकडे गांभीर्याने ‌‌‌‌लक्ष देण्याची गरज आहे.