डोकं सुन्न करणारा चित्रपट : विजय सेतुपतीचा ‘महाराजा’ पाहून उडेल तुमची झोप

टीम AM : चित्रपट हिट करण्यासाठी प्रमोशनच्या वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला जातो. पण तरीही ते सिनेमे हिट होतीलच याची शाश्वती नसते. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका चित्रपटाविषयी सांगणार आहोत ज्याचं काहीच प्रमोशन न करता तो थिएटरमध्ये रिलीज झाला आणि त्यानं धुमाकूळ घातला. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाल्यानंतर ओटीटीवर रिलीज झाला आहे. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. हा सिनेमा म्हणजे साऊथचा स्टार विजय सेतुपती याचा ‘महाराजा’. हा चित्रपट नुकतंच नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत रिलीज झाला असून समीक्षकांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. कसा आहे हा सिनेमा जाणून घ्या…

‘महाराजा’ ही भूमिका विजय सेतुपतीनं साकारली आहे. या चित्रपटात त्याची सुरुवात एका सलूनमधून होते, जिथे तो काम करत असतो. तेवढ्यात एक ट्रक घरात घुसतो आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू होतो. त्यात त्याच्या मुलीचा जीव वाचतो कारण त्यानं एका डस्टबीनखाली मुलीला झाकलेलं असतं. त्यानंतर एके दिवशी लक्ष्मी चोरीला जाते आणि नंतर महाराजा तिच्या शोधासाठी पोलिसांकडे धाव घेतो. आता ती लक्ष्मी कोण आहे, लक्ष्मी चोरीला गेल्याची महाराजाला इतकी काळजी का आहे, सिनेमात पुढे काय होतं हा एक थरारक अनुभव आहे. या चित्रपटात जबरदस्त सस्पेन्स दाखवण्यात आला आहे.

विजय सेतुपतीने ‘महाराजा’ या पात्रात जीव ओतला आहे. विजयच्या अनेक छटा या चित्रपटात दिसतात. त्याने प्रत्येक सीनमध्ये खूपच दमदार अभिनय केला आहे.

या चित्रपटात बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. अनुराग हा एक चांगला दिग्दर्शक आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे, पण आजकाल तो आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं मन जिंकतोय. त्यानं या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली आहे. सेल्वमच्या भूमिकेत त्यानं इतकं चांगले काम केलंय की तुम्हाला त्याचा तिरस्कार वाटायला लागतो. अनुरागचा अभिनय पाहून तुम्ही चकित व्हाल. ममता मोहनदासने असिफा ही जबरदस्त भूमिका साकारली आहे, बाकी सगळ्यांनीच उत्तम अभिनय केला आहे.

निथिलन स्वामीनाथन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यांनी आपली भूमिका चोख बजावली आहे. कोणता सीन कुठे असावा याची पुरेपूर काळजी घेतली गेली आहे, चित्रपट पाहताना कुठेही तुम्ही कंटाळून जात नाही. चित्रपटातील एकामागून एक असे ट्विस्ट तुम्हाला क्लायमॅक्सपर्यंत खिळवून ठेवतात. तर क्लायमॅक्स पाहूनही तुम्ही हादरून जाल असा हा सिनेमा आहे.