जरा थांबा…बुट्टेनाथ साठवण तलाव आणि‌ रेल्वेचा प्रश्न मार्गी लावतोच‌‌ : खा. बजरंग सोनवणे 

अंबाजोगाईत खा. बजरंग सोनवणे यांचा दिमाखदार सोहळ्यात नागरी सत्कार 

टीम‌ AM : केज मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला भरभरुन प्रेम देत मतदानरुपी आशीर्वाद दिले आहेत. त्यांचा मी मनापासून ऋणी आहे. एक जिल्हृयाचा नवनिर्वाचित खासदार म्हणून बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मी कटीबद्ध आहे. त्यातल्या त्यात मराठवाड्याचं पुणं‌ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाजोगाई शहराचे नाव रोशन करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आहे. जरा थांबा… अंबाजोगाईच्या बुट्टेनाथ साठवण तलावाचा आणि‌ घाटनांदूर – अंबाजोगाई रेल्वेचा प्रश्न मार्गी लावतोच‌‌, अशी ग्वाही खा. बजरंग सोनवणे यांनी दिली.

‘इंडिया’ आघाडीच्या वतीने अंबाजोगाई शहरात खा. बजरंग सोनवणे यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन शहरातील मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आज दिनांक 13 जुलै शनिवार रोजी करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना बजरंग सोनवणे बोलत होते.

सत्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ विधीज्ञ ॲड. फरकुंद अली हे‌ होते. तसेच यावेळी ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांचे नेते राजेसाहेब देशमुख, कॉ. बब्रुवाहन पोटभरे, माजी आमदार पृथ्वीराज साठे,‌ डॉ. नरेंद्र काळे, शिवसेना गटाचे [उबाठा] बालासाहेब शेप, समाजवादी पार्टीचे ॲड. शिवाजी कांबळे, भाई तावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे [ शरदचंद्र पवार गट] तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

सत्काराला उत्तर देताना बजरंग सोनवणे म्हणाले की, अंबाजोगाई शहरात माझा सत्कार होतोय, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सध्या अंबाजोगाईत बरेच नेते राजकारणाच्या नादी लागलेले आहेत. परंतू, अंबाजोगाई भल्याभल्यांना कळली नाही. अंबाजोगाईची संस्कृती, अंबाजोगाईची जनता आणि अंबाजोगाईचे संस्कार अंगीकारून घेणं ज्याला जमलं त्यालाच अंबाजोगाई कळाली असे मी मानतो. अंबाजोगाई शहरात तेच ते भाषणं, तेच ते आश्वासनं किती दिवस चालणार ? आता कुठंतरी आपल्याला काही तरी बदलायची, मिळवायची वेळ आली आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावयाचे आहे, असे बजरंग सोनवणे यांनी सांगितले. 

पुढे बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की, ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांच्या सदस्यांनी अंबाजोगाईतील समस्यांचा पाडाच वाचला. मी त्यांना सांगतो, जरा थांबा… फक्त 60 दिवस काढा, केज मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्याचे चित्र बदलणार आहे. बीड जिल्ह्यात ‘इंडिया’ आघाडीचे सर्व आमदार निवडून येणार असून आता राज्यात इंडिया आघाडीचीचं सत्ता येणार आहे, असे सर्वेही समोर आले आहेत. त्यामुळे तुम्ही उपस्थित केलेले सर्वच प्रश्न सुटणार आहेत. त्यासाठी आपल्याला आता सर्वांनी मिळून काम करायचे आहे, असेही बजरंग सोनवणे यांनी सांगितले. 

पंकजा मुंडे यांचं केले अभिनंदन

नागरी सत्कार सोहळ्यात खा. सोनवणे यांनी पालकमंत्र्यांवर टीका करीत उर्वरित कालावधीत जनतेची कामं करा, असा सल्ला दिला आणि दुसरीकडे विधानपरिषदेवर निवडून आल्याबद्दल पंकजा मुंडे यांचं पक्षाच्या वतीने अभिनंदनही केले. त्यासोबतच खा. सोनवणे यांनी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांनाही खडे बोल सुनावत सोशल मीडियाचा वापर हा चांगल्या गोष्टींसाठी करा, असे आवाहनही केले. 

मोटार सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

अंबाजोगाई शहरात खा. बजरंग सोनवणे यांचा दिमाखदार सोहळ्यात नागरी सत्कार पार पडला. तत्पूर्वी शहरातील यशवंतराव चव्हाण चौकातून भव्य अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करित खा. सोनवणे यांचं ‘जेसीबी’ च्या सहाय्याने मोठा हार घालून भव्य स्वागत करण्यात आले. या रॅलीत ढोलताशांचा गजर आणि तरुणाईचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येते होता. 

नागरी सत्काराला मोठी गर्दी

अंबाजोगाई शहरातील मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात खा. सोनवणे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्यात बीड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, कॉ. बभ्रुवाहन पोटभरे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, डॉ. नरेंद्र काळे, भाई थावरे, ॲड. शिवाजी कांबळे, कालिदास आपेट यांचीही समयोचित भाषणं झाली. अध्यक्षीय समारोप ॲड. मीर फरकुंद अली यांनी केला. या सत्कार सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. सभागृह ‘हाऊसफुल्ल’ झाले होते. नागरी सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.