पंकजा मुंडे यांचा विधानपरिषदेच्या निवडणूकीत विजय : कार्यकर्त्यांचा जल्लोष

टीम AM : विधानपरिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी 23 मतांचा कोटा पूर्ण करणे आवश्यक होतं. पंकजा यांनी त्यापेक्षा 3 जास्त म्हणजेच 26 मत मिळवत विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयानंतर मुंडे कुटुंबाने तसेच पंकजां मुंडेंच्या समर्थकांनी विजयी गुलाल उधळून आनंद साजरा केला.

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी (12 जुलै) मतदान झालं. या निवडणुकीत भाजपानं पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकर आणि सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती. भाजपाकडं असलेल्या संख्याबळाच्या जोरावर पंकजा यांचा विजय निश्चित मानला जात होता.

फटाक्यांची आतिषबाजी

पंकजा मुंडे यांच्या विजयानंतर बीडच्या परळी येथील ‘यशश्री’ निवासस्थानी मुंडे समर्थकांनी जल्लोष केला. गुलाल आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मुंडे समर्थक आनंद व्यक्त करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करावे, अशी मागणी मुंडे समर्थकांमधून होत होती. आज अखेर विधान परिषदेवर पंकजा मुंडे या निवडून आल्या आहेत आणि हाच उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतोय.