टीम AM : पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झालेला भारतीय धावपटू अविनाश साबळे यानं काल डायमंड लीग स्पर्धेत पुरुषांच्या 3 हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला. पॅरिसच्या चार्लेटी मैदानावर झालेल्या स्पर्धेत अविनाशने 8 मिनिटं, 9 सेकंद आणि 91 मायक्रोसेकंदांमध्ये अंतर पार करत नवा विक्रम प्रस्थापित केला.
या विक्रमासह अविनाशला स्टीपलचेस प्रकारात सहावं स्थान मिळवता आलं. जुना राष्ट्रीय विक्रमही अविनाशच्या नावावर नोंदला आहे. दोन वर्षांपूर्वी अविनाशनेच बर्मिंघमच्या राष्ट्रकुल स्पर्धेत स्टीपलचेस प्रकारात 8 मिनिटं आणि 11 सेकंद 20 मायक्रोसेकंद असा विक्रम केला होता.
स्टीपलचेस प्रकारात नॅशनल रेकॉर्ड नावावर असणाऱ्या अविनाशचा प्रवासही प्रेरणादायी आहे. बीड जिल्ह्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अविनाशला शाळेत जायला गाडी मिळायची नाही, म्हणून हा कार्यकर्ता 6 किलोमीटर लांब असलेल्या शाळेत पळत जायचा. इथूनच त्याला पळण्याची गोडी लागत गेली. 12 वी झाल्यावर तो सैन्यात भरती झाला.
महार रेजिमेंटमध्ये कार्यरत असताना त्याची पोस्टिंग सियाचीन, राजस्थान अशा दुर्गम ठिकाणी झाली. 2015 मध्ये इंटर आर्मी क्रॉसकंट्री स्पर्धेत भाग घेण्यापासून सुरुवात करत अविनाश पुढं स्टीपलचेसमध्ये उतरला.
2018 मध्ये एशियन गेम्समध्ये क्वालिफाय होण्याची संधी हुकल्यानंतर त्यानं नॅशनल रेकॉर्ड केला. नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये वर्चस्व गाजवलं. अमेरिकेत झालेल्या 5000 मीटरच्या रेसमध्ये जेव्हा अविनाशनं बाजी मारली, तेव्हा बीडमध्ये तोफा वाजवून जल्लोष करण्यात आला होता.