टीम AM : ‘माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा मी फक्त पाच वर्षांचा होतो. माझ्या आईने मग सर्व जबाबदाऱ्या एकटीने उचलून कामाला सुरुवात केली. कधी कधी दिवस चांगले गेले आणि कधी कधी किरकोळ गरजाही पूर्ण होत नव्हत्या,’ असे जसप्रीत बुमराहने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते.
बुमराह हा सधन, संपन्न कुटुंबातून आला असला तरी लहान वयातच वडिलांना गमावल्यानंतर आई आणि संपूर्ण कुटुंबाला खूप वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले.
घरची संपूर्ण जबाबदारी आई दलजीत यांच्यावर आली. त्यांनी शाळेत शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि एकटीने कुटुंब सांभाळले. पुढे त्या शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या. त्यावेळी आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसतानाही त्यांनी आपल्या मुलाला क्रिकेटमध्ये पुढे जाण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला.
बुमराह म्हणतो, ‘आईची इच्छा होती की, मी चांगली नोकरी करून जीवनात स्थिरावलो पाहिजे, पण तिने माझ्यावर कधीही डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्यासाठी दबाव टाकला नाही. मी स्वतःचा मार्ग निवडला आणि तिने मला पूर्ण पाठिंबा दिला. त्या कठीण काळातून आम्ही खूप काही शिकलो. आईने आमच्यासाठी खूप काही केले, त्यांच्यामुळेच आज मी या पदावर आहे.’