टीम AM : नवीन शैक्षणिक वर्षे सुरू झाले असून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी विविध प्रमाणपत्रांची गरज भासत आहे. त्यासोबतचं शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महिला, शेतकरी, जेष्ठ नागरिक सेतू सुविधा केंद्रावर मोठी गर्दी करत आहेत. पण सेतू केंद्रावर तहसील प्रशासनाचं कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने सेतू सुविधा केंद्र चालक आणि प्रमाणपत्र काढून देणारे जनतेकडून अधिकचे पैसे घेत आहेत. तहसील कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून लाखो रुपयांची उलाढाल या सेतू सुविधा केंद्रात होत आहे. प्रमाणपत्रासाठी शासनाचे रितसर शुल्क भरून देखील विद्यार्थ्यांना, महिलांना आणि जेष्ठ नागरिकांना सेतू केंद्रात आणि तहसील कार्यालयात प्रमाणपत्रासाठी चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे सामान्य माणसांची हेळसांड होत असून तहसीलदारांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणासाठी आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. ही प्रमाणपत्रं सेतू सुविधा केंद्रामार्फत संबंधीत विद्यार्थ्यांना, महिलांना, शेतकऱ्यांना आणि जेष्ठ नागरिकांना वितरीत केले जातात. सेतू सुविधा केंद्र जरी खाजगी असले तरी यावर पूर्ण नियंत्रण तहसील प्रशासनाचे असते. सेतू सुविधा केंद्रामार्फत दाखल केलेल्या प्रमाणपत्रासाठी सात ते आठ दिवसांचा कालावधी लागत असल्याने विद्यार्थ्यांची आणि जनतेची पिळवणूक होत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे आणि सेतू सुविधा केंद्र चालकांचे संगनमत असल्याने जो पैसे देईल त्याला तातडीने प्रमाणपत्र देण्यात येत आहे. एका प्रमाणपत्रासाठी शेकडो रुपये सामान्य माणसांकडून वसूल करण्यात येत आहेत. दुसरीकडे पैसे नसणाऱ्या विद्यार्थ्यांना, महिलांना, शेतकऱ्यांना आणि जेष्ठ नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्रांसाठी तहसील कार्यालयाचे आणि सेतू सुविधा केंद्राचे उंबरठे झिझवावे लागत आहेत. तहसीलदार यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत जनतेची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
‘एचएसएम’ प्रणाली चालू करावी
अंबाजोगाई तहसील कार्यालयात ‘एचएसएम’ प्रणाली बंद करून ‘डीएससी’ प्रणाली सुरू केली आहे. या ‘डीएससी’ प्रणालीमुळे कोणतेही प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी अधिकचा वेळ लागतो. त्यामुळे गरजवंतांना लवकर प्रमाणपत्र मिळत नाही. तहसीलदारांनी ही गैरसोय लक्षात घेता बंद असलेली ‘एचएसएम’ प्रणाली तात्काळ सुरू करावी, अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे. दरम्यान, अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे यांनी ‘एचएसएम’ प्रणाली सुरु करण्यासाठी कार्यवाही सुरु केली आहे, असे सांगितले आहे.