टीम AM : ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेसाठी 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना कालपासून (दि. 1) अर्ज करता येणार आहेत. त्यासाठी ग्रामपंचयात कार्यालय, महा – ई – सेवा केंद्रे व अंगणवाड्यांमध्ये ऑफलाइन अर्ज भरून देता येणार आहेत. दुसरीकडे ‘नारीशक्ती’ ॲपवरूनही ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
योजनेसाठी तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला, राज्याचा अधिवास प्रमाणपत्र जरुरी आहे. दोन्ही दाखले काढण्यासाठी 10 ते 15 दिवसांची मुदत आहे आणि योजनेची मुदत देखील 15 दिवसांचीच आहे. त्यामुळे महिलांची चिंता वाढली असून योजनेसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आहे. योजनेच्या लाभासाठी ऑफलाइन व ऑनलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. 21 वर्षे पूर्ण झालेल्या महिलांसह 60 वर्षांपर्यंतच्या महिला योजनेसाठी पात्र आहेत. तुर्तास शासन निर्णयानुसार पात्र महिलांना 15 जुलैपर्यंत योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत आहे.
कोणत्या महिला असणार पात्र ?
- महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक
- विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला
- वयाची किमान 21 वर्ष पूर्ण व कमाल 60 वर्ष मर्यादा
- अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक
- अर्जदार महिलेच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजारांपेक्षा जास्त नसावे
- अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला नसेल
- ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल, अशा महिला
‘ही’ कागदपत्रे जोडणे बंधनकारक…
- ऑनलाइन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा
- आधार कार्ड आवश्यक
- राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला
- बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
- पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड
- योजनेच्या अटी – शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
- अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक
अर्ज भरण्याची तथा करण्याची ‘येथे’ सुविधा…
- अंगणवाडी केंद्रे
- बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये
- ग्रामपंचायत कार्यालये
- महापालिकेचे वॉर्ड (झोन) ऑफिस
- सेतू सुविधा केंद्र व महा ई सेवा केंद्रे
अर्ज भरण्याची प्रक्रिया…
- अर्ज करण्याची सुरवात : 1 जुलै
- अर्ज करण्याची शेवट तारीख : 15 जुलै
- प्रारूप निवड यादी प्रकाशित : 16 ते 20 जुलै
- प्रारूप यादीवर हरकत, तक्रार करणे : 21 ते 30 जुलै
- लाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित : 1 ऑगस्ट
- लाभ देण्यास सुरवात : 14 ऑगस्टपासून