खेळात सहभागी होणे म्हणजे खरा विजय – आ. नमिताताई मुंदडा

अंबाजोगाई : कोणत्याही खेळात सहभागी होणे म्हणजेच खरा विजय होय. प्रत्यक्ष विजयी होणे हे तर चांगलेच आहे पण जरी एखाद्यावेळी अपयश आले तरी खचून न जाता खेळात सहभागी झाले पाहिजे. तोच खरा विजय असतो असे प्रतिपादन आमदार नामिताताई मुंदडा यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने यो.शि.सं. च्या क्रीडांगणावर आयोजित बीड जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी उद्घाटक म्हणून नमिता मुंदडा बोलत होत्या.

पुढे बोलताना मुंदडा म्हणाल्या की, खेळामुळे शिस्त निर्माण होते, खेळ खेळण्याचे अनेक फायदे आहेत. मुलींनी स्वतःतील न्यूनगंड काढून वेगवेगळ्या क्रीडाप्रकारात सहभागी व्हावे असे मत त्यांनी व्यक्त केले. आपण स्वतः लाँनटेनिस मधील राष्ट्रीय खेळाडू म्हणून नाव कमावले असुन त्याचा फायदा झाला आहे. खेळ खेळण्याचे खूप फायदे मिळतात हे तरुणांनी लक्षात घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी अक्षय मुंदडा यांनी महाविद्यालयाने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. महाविद्यालयाच्या गुणी खेळाडूंनी महाविद्यालयाचे नाव रोषण करावे असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉ.सुरेश खुरसाळे यांच्या संबोधनाने झाला. युवकांप्रमाणेच मुलींनी देखील वेगवेगळ्या क्रीडाप्रकारात कौशल्य प्राप्त करावे. कुटूंबाने, समाजाने मुलींना विविध क्रीडा प्रकारात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. खेळामुळे मन सदृढ बनते असे प्रतिपादन डॉ.सुरेश खुरसाळे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य रमेश सोनवळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव आम्ही साजरा करीत आहोत. त्या निमित्त अनेक उपक्रम तसेच क्रीडा स्पर्धा आयोजित करून महाविद्यालय व समाजाचे अतूट नाते निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे मत सोनवळकर यांनी व्यक्त केले.

या क्रीडा स्पर्धेचे संयोजक स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे क्रिडा संचालक, उपप्राचार्य डॉ.प्रवीण भोसले यांनी केले. सातत्याने दहा वर्ष या स्पर्धा आम्ही यशस्वीरित्या पार पडल्या आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. किरण चक्रे यांनी केले तर पद्व्युत्तर विभागाच्या संचालिका प्रा. डॉ. शैलजा बरुरे यांनी आभार व्यक्त केले. या प्रसंगी जिल्हा क्रिडा समन्वयक प्रा. डॉ. वनगुजरे, विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. डॉ .पी. एल. कराड, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी यो.शि.संस्थेचे जेष्ठ सल्लागार ॲड. व्ही.के. चौसाळकर, कोषाध्यक्ष प्रा.माणिकराव लोमटे, संचालक प्रा. एन. के. गोळेगावकर, डॉ. साहेबराव गाठाळ, प्रा. एस. के. जोगदंड, शिशीर बेलुर्गीकर, जेष्ठ पत्रकार नानासाहेब गाठाळ, योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य जोशी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.