अजन्म विश्वस्त मंडळाचा प्रस्ताव धर्मादाय आयुक्तांनी फेटाळला
अंबाजोगाई : येथील ग्रामदेवता आणि कोकणस्थ ब्राह्मणांची कुलदेवता माता योगेश्वरीच्या सर्व स्थावर आणि जंगम मालमत्तेच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या योगेश्वरी देवल कमेटीच्या विद्यमान १७ संचालक मंडळाने दाखल केलेला अजन्म विश्वस्त मंडळाचा प्रस्ताव फेटाळून लावत मे. सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या न्यायालयाने पुन्हा फक्त तीन महिनेच काळजीवाहू संचालक म्हणून काम पाहण्याचे व नवीन सभासदांची नोंदणी करुन तीन महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.
अंबाजोगाई येथील ग्राम देवता आणि कोकणस्थ ब्राह्मणांची कुलदेवता असलेल्या माता श्री योगेश्वरी देवीच्या शहर आणि परीसरात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेच्या संरक्षणासाठी १९६५ साली योगेश्वरी देवल कमेटीची शासनाच्या नियमानुसार नोंदणी झाली असून या न्यासाच्या नोंदणीचा क्रमांक ए ९९९ बीड हा आहे. १९६५ साली स्थापन झालेल्या या न्यासाचे अनेक सभासद कालवश झाल्यानंतर केवळ दोन संचालकांवर चालणाऱ्या या न्यासाच्या संचालक मंडळाचा नव्याने विस्तार करण्यात यावा अशी मागणी सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या न्यायालयात २०१६ साली करण्यात आल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी १०/११/२०१६ रोजी जुने दोन संचालक सोबत घेवून एकुण १७ सदस्यांची पुढील तीन वर्षासाठी नवीन संचालक म्हणून नियुक्ती केली. या नवनियुक्त संचालक मंडळाची मुदत ही १९/११/२०१९ राहील असे ही या आदेशात स्पष्ट करण्यात आले होते.
सदरील संचालक मंडळाची मुदत संपण्यापुर्वीच सदरील न्यासाचे सचीव भगवान सिताराम शिंदे यांनी मे. सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या न्यायालयात दि. २४/१०/२०१९ रोजी शपथपत्र दाखल करुन या न्यासाची मुदत पुढील महिन्यात संपत असून मंजुर योजनेतील तरतुदी ह्या न्यासाच्या सुव्यवस्थापनेच्या व विकासाच्या दृष्टीने अडचणीच्या, अस्पष्ट व गुंतागुंत निर्माण करणा-या असल्यामुळे या योजनेत आवश्यक त्या सुधारणेसह सुधारित योजना मंजुरीकरीता प्रस्तुत प्रकरण दाखल करण्यात आले असून प्रस्तुत कलम ५०(अ) (३) अन्वये या प्रकरणास मंजुरी देण्याची विनंती करण्यात आली होती. या प्रस्तावीत दुरुस्तीत विश्वस्त मंडळातील १७ संचालकांना अजीव (तहहायात) सदस्य म्हणून राहतील तसेच न्यासाच्या पाच पदाधिकाऱ्यांपैकी पदसिद्ध अध्यक्ष सोडून उपाध्यक्ष, सचीव, सहसचिव आणि कोषाध्यक्ष या चार पदाधिकाऱ्यांचा कालावधी पाच वर्षासाठी राहील व त्यांची निवड दर पाच वर्षांनी सर्व विश्वस्तांमधुन करण्यात येईल असा प्रस्ताव सुचवण्यात आला होता. या प्रस्तावावर न्यासाचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार अंबाजोगाई, पृथ्वीराज शिवाजी साठे (उपाध्यक्ष), भगवान सीताराम शिंदे (सचीव), राजकिशोर कांताप्रसाद मोदी (सहसचीव), कमलाकर शिवाजी चौसाळकर (कोषाध्यक्ष), आणि विश्वस्त गिरीधारिलाल नंदलाल भराडिया, गौरी ललित जोशी, श्रीराम अवधुत देशपांडे, शरद शिवाजी लोमटे, पुजा राम कुलकर्णी, अशोक तुळशीराम लोमटे, संजय किसन भोसले, आणि उल्हास गोपाळ पांडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या न्यायालयात न्यासाच्या विश्वस्तांनी दाखल केलेल्या प्रस्तावावर संजय प्रभाकर लोणीकर, कमलाकर शिवाजी कोपले, शिरीष शिवाजी पांडे, दिलीप एकनाथ सांगळे, दिनेश जगन्नाथ परदेशी, डॉ. प्रा. गणेश गंगाधर पिंगळे, डॉ. गोपाळ बाळकृष्ण चौसाळकर, योगेश चंद्रशेखर पांडे, नितीन शामराव काळम पाटील, विनोद सिद्राम पोखरकर, सुप्रिया श्रीधर सोमण, कल्याणी जयदीप विर्धे, शशिकांत गोपीनाथ लोमटे, ॲड. किशोर विठ्ठल गिरवलकर, दिलीप रामकृष्ण काळे, स्वप्नील बलराम परदेशी, संतोष सदाशिव काळे, दाजीसाहेब काशिनाथ लोमटे यांनी आक्षेप नोंदवत विदयमान विश्वस्त मंडळाने मागणी केल्याप्रमाणे कलम ५०(अ) (३) व नियम १९५७ चे नियम २६ (३) अन्वये सुधारित योजना मंजुर करु नये व १०/११/२०१६ रोजी तत्कालीन सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी उक्त केलेल्या योजनेअंतर्गत ज्या नागरिकांनी रितसर अर्ज दिला आहे याच लोकांमधुन नवीन विश्वस्त मंडळाची निर्मिती करावी अशी मागणी केली होती.
या न्यासाचे सचीव भगवान शिंदे यांनी दाखल केलेल्या शपथपत्रावर आणि घेण्यात आलेल्या आक्षेपावर सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या न्यायालयात सुनावणी होवून न्यायालयाने विदयमान संचालक मंडळास फक्त तीन महिने काम करण्याची संधी दिली असून नवीन संचालक मंडळाच्या निवडीसाठी विदयमान काळजीवाहू संचालक मंडळाने दिलेल्या निर्देशानुसार नवीन सभासद नोंदणी करुन त्यांचे अर्ज तात्काळ जमा करून घ्यावेत आणि तीन महिन्याच्या आत निवडणुका घ्याव्यात असे आदेश सहाय्यक धर्मादाय आयुक्त सय्यद विलायत हुसेन कादरी यांच्या न्यायालयाने १५/११/२०१९ रोजी दिले आहेत.