रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीचा पुढाकार
अंबाजोगाई : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ अंबाजोगाईत शनिवारी सकाळी शहरवासियांच्या वतीने भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीने या मोर्चासाठी पुढाकार घेतला. देशातील महिलांच्या सुरक्षेसोबतच अंबाजोगाईतील महिला व विद्यार्थिनींना सुरक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
शनिवारी सकाळी वंजारी वसतिगृहाच्या मैदानावरून निघालेला मोर्चा सावरकर चौक, मंगळवारपेठ, मंडीबाजार, गुरुवारपेठ, शिवाजी चौक मार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना दिले. अंबाजोगाई शहरात महाविद्यालयात व खाजगी क्लासेसला जात असतांना विद्यार्थिनींची होणारी छेडछाड रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस उपाययोजना आखाव्यात. यापूर्वी शहरात विद्यार्थिनींची छेडछाड, विनयभंग, चाकूहल्ला, अशा घटना घडलेल्या आहेत. तरीही मुलींना पाहून हॉर्न वाजविणे, वाहनांचा कट मारणे, बिभित्स चाळे करणे, असे प्रकार क्लासेसच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अशा परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी. शाळा व महाविद्यालय भरतांना व सुटतांना अण्णाभाऊ साठे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी ट्रॉफिक पोलिस उभे करून वाहतूक नियंत्रित ठेवावी. पोलिसांच्या दामिनी पथकाद्वारे रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा. शहरात चौका-चौकात वाहने थांबवून ठिकठिकाणी मुलांचा घोळका थांबतो, त्यामुळे महिला व मुलींना येता-जातांना मोठा त्रास होतो. यावर ठोस उपाययोजना आखाव्यात. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आखाव्यात, कायद्यांची कडक अंमलबाजवणी व्हावी व महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. अशा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
यावेळी आ.नमिता मुंदडा, उपनगराध्यक्षा सविता लोमटे, रोहिणी पाठक यांची भाषणे झाली. मोर्चात ज्येष्ठ नागरिक संघाच्या कमल बरूरे, अंजली चरखा, प्रा. रोहिणी पाठक, ज्येष्ठ नागरिक संघाचे पुंडलिक पवार, जनार्धन मुंडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. सचिन कराड, सचिव स्वप्निल परदेशी, पंचायत समितीचे उपसभापती तानाजी देशमुख, अॅड. संतोष लोमटे, अनंत आरसुडे, जगदीश जाजू, डॉ. निशिकांत पाचेगावकर, कल्याण काळे, विश्वनाथ लहाने, गोरख मुंडे, डॉ. अनिल केंद्रे, भीमाशंकर शिंदे, राधेश्याम लोहिया, अनिरुद्ध चौसाळकर यांच्यासह शालेय विद्यार्थीनी, इनरव्हील क्लब, व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.