रस्ता ओलांडणाऱ्या महिलांना पिकअपची धडक : अंबाजोगाई तालुक्यातील दोन महिलांचा मृत्यू 

टीम AM : अंबाजोगाई – केज रस्त्यावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. लघुशंकेसाठी रस्ता ओलांडून जात असलेल्या दोन महिलांना भरधाव पिकअपने चिरडल्याने गंभीर जखमी झालेल्या दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात केज – अंबाजोगाई रस्त्यावरील चंदनसावरगाव गावाजवळ रविवारी [दि. 23] रात्री 10 वाजेच्या सुमारास झाला. अपघातात मृत्यू पावलेल्या या महिला अंबाजोगाई तालुक्यातील रहिवासी आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

या बाबत प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई तालुक्यातील मुडेगाव येथील वंदना बाळासाहेब भंडारे [वय 38] व जवळगाव येथील वैशाली केशव होळकर [वय 28] या दोन महिला आपल्या नातेवाईकांसह अंबाजोगाई येथून पिकअपने आळंदी येथे देवदर्शन व पुणे येथील भावाच्या घराच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी रविवारी रात्री पुण्याकडे निघाल्या होत्या. अंबाजोगाईहुन केजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चंदनसावरगाव पासून काही अंतरावर असलेल्या पेट्रोलपंप व मोरया हॉटेलच्या दरम्यान त्यांनी लघुशंकेसाठी पिकअप रस्त्याच्या कडेला उभा केला. यावेळी पिकअपमधून उतरून वंदना भंडारे व वैशाली होळकर या दोघी रस्ता ओलांडून लघुशंकेसाठी जात असताना केजकडून अंबाजोगाईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात पिकअपने या दोघींना जोराची धडक देत पिकअप निघून गेला. 

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वंदना भंडारे व वैशाली होळकर या दोघींना उपचारासाठी केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉ. समाधान घुगे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच गस्तीवर असलेले युसुफवडगाव ठाण्याचे सहाय्यक फौजदार अमजद सय्यद, जमादार आतार यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.