टीम AM : ‘स्वाराती’ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग – 3 च्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची अत्यंत दुरावस्था झाली असून वेळोवेळी निवेदने, मागणी करुनही या निवासस्थानांच्या समस्या काही सुटत नाहीत. निवासस्थानांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पुन्हा येथील कर्मचाऱ्यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 1 जुलै पर्यंत समस्या नाही सोडविल्या तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ‘डिवायएफआय’ संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
‘स्वाराती’ रुग्णालय परिसरात वर्ग – 3 च्या कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानं बांधण्यात आली आहेत. ही निवासस्थानं अत्यंत जुनी झाली असून यात सोयीसुविधांचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे येथे वास्तव्यास असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्या भेडसावत आहेत. या समस्या दूर करण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांनी अधिष्ठाता, बांधकाम विभागाचे अधिकारी यांना वेळोवेळी भेटून निवेदनेही दिली. परंतू, कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे.
मोडकळीस आलेले दरवाजे, खिडक्या आणि इमारतीत उगवलेली झाडं. त्यासोबतच अनेक समस्यांनी या इमारतींना घेराव घातला आहे. त्याचा त्रास या कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्रश्नावर लक्ष केंद्रित करित ‘डिवायएफआय’ संघटना आक्रमक झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या निवेदनावर ‘डिवायएफआय’ चे जिल्हाउपाध्यक्ष सुहास चंदनशिव, तालुकाध्यक्ष देविदास जाधव, तालुका सचिव प्रशांत मस्के, संतोष केंद्रे आदींच्या सह्या आहेत.