टीम AM : बीड जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाण म्हणून सौताडा येथील रामेश्वर धबधबा खूप चर्चेत असतो. तीनशे फुटाहूनही जास्त उंच धबधब्यावरुन कोसळणारे पाणी पर्यटकाना भुरळ घालत असते. सौताडामधील हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. या धबधब्याचे मनमोहक आणि विहंगम दृश्य नेहमी पर्यटकांना आकर्षित करत असते.
पाचशे फूट खोल दरीत श्रीक्षेत्र रामेश्वर तीर्थस्थळ असून येथील धबधब्याचा आवाज सकाळी दोन किलोमीटर अंतरापर्यंत ऐकायला येतो. गावात भूकंपासारखे हादरे देखील ऐकू येतात. मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र रामेश्वर हे तीर्थस्थळ सौताडा जामखेडपासून अकरा किलोमीटर, अहमदनगरपासून नव्वद किलोमीटर तर बीडपासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे.
बीड आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या गावात धबधब्याचे निसर्गरम्य व विहंगम चित्र पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळत असते.