टीम AM : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता मतदारांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असून यासाठी सर्वच उमेदवार तयारीला लागले आहेत. केज मतदारसंघातही माजी आमदार संगिता ठोंबरे यांनी निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली असून त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढवित गाठीभेटीवर भर दिला आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी माजी आमदार ठोंबरे यांनी मोर्चेबांधणी सुरु करीत सामान्य जनतेशी संवाद साधत आहेत.
केज मतदारसंघात माजी आमदार संगिता ठोंबरे या 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून आल्या होत्या. भारतीय जनता पार्टी कडून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि त्याच दरम्यान सरकारही महायुतीचे असल्याने संगिता ठोंबरे यांनी केज विधानसभा मतदारसंघात अनेक विकासात्मक कामे मार्गी लावले होते. ग्रामीण भागातील रस्ते असोत किंवा प्रशासकीय इमारती त्यांच्या काळामध्ये कार्यान्वित झाल्या.
अंबाजोगाई शहरातील काळवटी साठवण तलावाची उंची वाढविण्याचा प्रश्न त्यांनी निकाली काढत गोरगरीब रुग्णांना आशेचा किरण असलेल्या ‘स्वाराती’ रुग्णालयाच्या विकासासाठी त्यांनी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र, सन 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ऐनवळी विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्या तिकीट मिळवण्यात यशस्वी झाल्या आणि आमदारही झाल्या. मात्र, पाच वर्षांच्या कालावधीमध्ये संगिता ठोंबरे यांनी जनसंपर्क कायम ठेवलेला असून मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार असून त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संगिता ठोंबरे यांनी जनसंपर्क वाढवला आहे.
ठोंबरे यांच्या कार्यकाळात केज मतदारसंघातील मतदार आणि कार्यकर्ते त्यांच्या विकासात्मक कामाबद्दल समाधानी आहेत. त्यामुळे जनतेतूनच त्यांनी येत्या विधानसभेची निवडणूक लढवावी, अशी इच्छा असल्याने ठोंबरे यांनी केज विधानसभा मतदारसंघामध्ये गाठीभेटीवर जोर दिला असून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दरम्यान, त्यांनी कामाला सुरुवात केलेली असली तरी त्या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार ? असे तर्कवितर्क लढवले जात असले तरी येत्या काही दिवसात त्या आपली भूमिका स्पष्ट करतील, अशी माहिती आहे.