टीम AM : महाराष्ट्रातील जनतेसाठी महत्वाची बातमी आहे. सर्व नागरिकांना जुलै महिन्यापासून आरोग्य विम्याचा लाभ मिळू शकणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत हा विमा मिळणार आहे. या योजनेमुळे जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. ही योजना नेमकी काय आहे ? यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात…
सरकार 3 हजार कोटी खर्च करणार
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आतापर्यंत 1.5 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळत होते. जे केवळ 1 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी होते. या नियमामुळे अनेक नागरिक या योजनेपासून वंचित राहत होते. मात्र आता या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. तसेच युनायटेड इंडिया ॲश्युरन्स या विमा कंपनीला हे काम देण्यात आले आहे. सरकार या विमा कंपनीला प्रति कुटुंब 1,300 रुपये प्रीमियम देणार आहे. यासाठी सरकारी तिजोरीतून 3 हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.
विम्याची रक्कम वाढवली
राज्यातील जनतेला घरपोच आरोग्य सेवा अधिक चांगल्या पद्धतीने देण्यासाठी आणि नागरिकांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी सरकारने MJPJAY योजना सुरू केली होती. गेल्या वर्षी जूनमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MJPJAY ची कव्हर रक्कम 1.5 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याची घोषणा केली होती. आता लवकरचं या घोषणेची अंमलबजावणी होणार आहे.
‘या’ कागदपत्रांची आवश्यकता
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे. यासाठी शिधापत्रिका (रेशन कार्ड) किंवा अधिवास प्रमाणपत्र (डोमासाईल) आवश्यक असणार आहे. या कागदपत्रांची पुर्तता करणाऱ्यांनी विम्याचे संरक्षण मिळेल.
1900 रुग्णालयांमध्ये उपचार होणार
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सध्या 1000 रुग्णालयांमध्ये घेता येत आहे. आता आणखी 900 रुग्णालये या योजनेशी जोडली जाणार आहेत. म्हणजेच आता या योजनेंतर्गत एकूण 1900 रुग्णालयांमध्ये उपचार घेता येणार आहे.
कोणत्या रुग्णालयात उपचार घेता येणार ?
या योजनेअंतर्गत रुग्णाला उपचार घेण्यासाठी MJPJAY शी संलग्न असणाऱ्या रुग्णालयात जावे लागेल.
https://www.jeevandayee.gov.in या वेबसाइटवर या योजनेशी संलग्न असलेल्या रुग्णालयांची यादी उपलब्ध आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला नेटवर्क हॉस्पिटलच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुमचा जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला रुग्णालयांची संपूर्ण यादी दिसेल.