पीक विमा भरण्यास सुरुवात : एक रुपयात भरला जाणार पीक विमा – धनंजय मुंडे

शेतकऱ्यांनी आपला खरीपाचा पीकविमा 15 जुलै पूर्वी भरून घ्यावा – कृषिमंत्र्यांचे आवाहन

टीम AM : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम – 2024 साठी पीक विमा भरण्याची सुरुवात आजपासून शासनाच्या https://www.pmfby.gov.in या पोर्टलद्वारे करण्यात आली असून, याही वर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ 1 रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिली आहे. 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत मागील वर्षी विक्रमी 1 कोटी 70 लक्ष पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपला पीकविमा भरून या योजनेत सहभाग घेतला होता. 

खरीप – 2024 साठी भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, भुईमूग, तीळ, कारळे, कांदा ही 14 पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. तर या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै असून, त्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरून घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.