टीम AM : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अल्याड पल्याड’ या मराठी चित्रपटात अंबाजोगाई येथील व्ही. आर. ऋग्वेद या 19 वर्षीय मुलाने संगीत दिले आहे. इतक्या कमी वयातच एका चित्रपटाचा म्युझिक डायरेक्टर म्हणून ऋग्वेदचे नाव पुढे आले आहे. तर या चित्रपटातील दोन गाण्यांचे प्रोडक्शन अंबाजोगाईतील व्ही. आर. ऋग्वेद म्यूजिक स्टूडियो यातून झाले आहे. अंबाजोगाईकरांसाठी ही खूप आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. या आधी पण अंबाजोगाईतून बऱ्याच दिग्गज व वयस्कर कलाकारांनी आपले नाव चित्रसृष्टीत गाजवले आहे. परंतू, स्वतंत्र एखाद्या इंडस्ट्री मधील चित्रपटाच्या संगीताचे काम मुंबई किंवा पुणे या शहरांमध्ये न करता ते अंबाजोगाई शहरात झाले आहे व ते खूप उत्तमरित्या पार पाडले गेले आहे.
या चित्रपटात दोन गाणी ‘रांगडा नाच’ आणि ‘अल्याड पल्याड’ (शीर्षक गीत) ही ऋग्वेदनी दिग्दर्शित केली आहेत. यात ‘रांगडा नाच’ गाण्यात अंबाजोगाईची गायिका ऋचा कुलकर्णी हिने गायन केलेले आहे. तसेच शार्दूल पाटील यांनी सुद्धा या गाण्यात गायन केले आहे आणि गाण्याचे शब्द लिहिले आहेत. उर्वरित कार्य जसे काँपोझिंग, मिक्सिंग, म्युझिकल प्रोग्रामिंग, म्युझिक अरेंजमेंट आदी कार्य ऋग्वेदने केलेले आहे. तसेच शीर्षक गीताचे शब्द नायुम पठाण यांनी लिहिले आहेत.
हा चित्रपट प्रीतम एस. के. पाटील यांनी दिग्दर्शित केलेला आहे. तसेच याचे निर्माते शैलेश जैन व महेश निंबाळकर हे आहेत. या चित्रपटात खूप दिग्गज कलाकारांनी काम केलेले आहे. जसे मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, चिन्मय उदगीरकर आदी कलाकारांचा समावेश आहे.
चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रतिसाद मिळत आहे व याची गाणी खूप प्रसिद्ध झाली आहेत. मराठी चित्रपट सृष्टीत हा एक वेगळा असा थरारपट आहे. यात महत्त्वाचे म्हणजे अंबाजोगाईचे योगदान आहे. तुम्ही या चित्रपटाचा आस्वाद जवळच्या चित्रपटगृहात जाऊन घेऊ शकता. व्ही. आर. ऋग्वेद यास पुढील कार्यास शुभेच्छा.