पीक कर्जाचं उद्दिष्ट जून अखेरपर्यंत पुर्ण करा : कृषिमंत्री धनंजय मुंडे

बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या दुकानांवर कठोर कारवाईचा मुंडेंचा इशारा 

टीम AM : राज्यात बी – बियाणांची चढ्या भावानं विक्री किंवा बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी निविष्ठा दुकानदारांवर कठोर कारवाईचा इशारा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. राज्यातले सर्व विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कृषी अधिकारी यांची आढावा बैठक मुंडे यांनी काल घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त तीन भरारी पथकं नेमावीत तसंच या भरारी पथकांनी दररोज कमीत कमी 25 दुकानांवर धडक भेटी देऊन तपासण्या कराव्यात, कोणताही गैरप्रकार आढळल्यास जागच्या जागीच गुन्हा दाखल करून परवाना निलंबनाची कारवाई करावी, असे निर्देश मुंडे यांनी दिले आहेत.

प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी जून अखेर पर्यंत पीक कर्जाचं उद्दिष्ट 75 टक्के मर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना मुंडे यांनी दिल्या आहेत.