‘चंदू चॅम्पियन’ : काळाच्या आड दडलेली नाट्यपूर्ण संघर्षगाथा 

टीम AM : दिग्दर्शक कबीर खानमध्ये दडलेला उत्कृष्ट कथाकार आपल्याला काळाच्या पडद्याआड हरवलेली, भारताला पॅरालिम्पिकमध्ये पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांची जीवनकथा इतक्या आश्वासक पद्धतीने मांडतो की प्रेरणा तर मिळतेच शिवाय एक उत्तम स्पोर्ट्स ड्रामा पाहिल्याचे समाधानही मिळते.

सिनेमात 1960 ते 2018 चा काळ अतिशय जीवंतपणे उभा केला गेला आहे. मुरलीकांत पेटकर यांच्या आयुष्यात थक्क करणाऱ्या अनेक नाट्यपूर्ण घटना घडल्या आहेत. मूळ गावात पैलवानीचे लागलेले वेड, त्या नादात सूटलेले गाव, अपघाताने सैन्यदलात प्रवेश ते मुष्टीयोद्धा बनण्याचे प्रशिक्षण, ऑलम्पिक स्पर्धेतला सहभाग आणि थोडक्यात हुकलेले सुवर्णपदक, 1965 च्या युद्धानंतर आलेलं अपंगत्व आणि त्यावर मात करत नव्या जिद्दीने पुन्हा पॅरालिम्पिकमध्ये जलतरणपटू म्हणून भारताचे प्रतिनिधित्व या सगळ्या गोष्टी पडद्यावर अस्सलपणे उभ्या राहतात. महाराष्ट्रातल्या सांगलीचे नयनरम्य चित्रण सिनेमाचा प्रभाव वाढवते तर मध्यंतरापूर्वी आलेल्या युद्धाच्या प्रसंगात सिनेमाच्या तांत्रिक टीमचं कौशल्य दिसून येतं. 

‘बजरंगी भाईजान’ मध्ये सलमान खान कडून उत्कृष्ट काम करून घेणाऱ्या कबीर खानने इथं कार्तिक आर्यनकडून त्याच्या करीयरमधला सर्वोत्कृष्ट अभिनय करवून घेतला आहे. आजवर कधी न पाहायला मिळालेला कार्तिक आपल्याला या सिनेमात बघायला मिळतो. त्याच्या अभिनयासोबतच शारीरिक मेहनतीचाही अंदाज येतो. भुवन अरोरा, यशपाल शर्मा, अनिरुद्ध दवे आणि ब्रिजेंद्र काला यांच्या छोट्या भूमिकाही प्रभावी आहेत. विजय राज आणि कार्तिक आर्यन यांची केमिस्ट्री खास जुळून आली आहे. पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत श्रेयस तळपदेने नेटकं काम केलंय तर गणेश यादव, हेमांगी कवी, सोनाली कुलकर्णी, हिमांशू जयकर या मराठी कलाकारांनी सिनेमाच्या पार्श्वभूमीला साजेसं काम केलं आहे.

सिनेमाच्या पूर्वार्धाची मांडणी वेगवान आणि प्रामाणिक आहे. पण उत्तरार्धात सिनेमाचा वेग कमी होतो. काही भावनिक प्रसंग मनाचा ठाव घेतात पण काही अगदीच सुमार भासतात. जलतरण स्पर्धेतही अपेक्षित थरार जाणवत नाही; त्यामुळे क्लायमॅक्स हवा तेवढा उठावदार होऊ शकलेला नाही. गाण्यांसाठी सिनेमात वाव नसल्याने सिनेमातली गाणी विशेष प्रभाव टाकत नाहीत. अपवादानेच एखादं गाणं लक्षात राहतं. 

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक सिनेमांचा हंगाम सुरु आहे. ’12th फेल’, ‘मैदान’ आणि ‘श्रीकांत’ यांच्यानंतर आलेला हा सिनेमा या हंगामामुळे तयार झालेल्या उदासीनतेचा बळी ठरू नये. कबीर खान आणि कार्तिक आर्यनची प्रामाणिक मेहनत पडद्यावर ठळकपणे दिसून येणारी असल्याने या सिनेमाला एक संधी नक्की मिळायला हवी.

© डॉ. स्वप्नील देशमुख