मंत्री हसन मुश्रीफ यांची माजी आमदार संजय दौंड यांनी घेतली भेट
टीम AM : ‘स्वाराती’ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय सध्या विविध समस्यांनी ग्रासले आहे. सोनोग्राफी, सिटीस्कॅन, डायलिसिस वारंवार बंद पडत आहेत. अपुरे तंत्रज्ञ, रिक्त कर्मचाऱ्यांची पदे यामुळे ‘स्वाराती’ च्या आरोग्य सेवेवर परिणाम होताना दिसून येत आहे. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी माजी आमदार संजय दौंड यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी काल दिनांक 11 जूनला मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेत रुग्णालयाच्या समस्यांचा पाडाच वाचला. या समस्यांबाबत माजी आमदार संजय दौंड यांनी मंत्री महोदयांना रितसर निवेदनही दिले. या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘स्वाराती’ च्या समस्या जाणून घेत तात्काळ प्रलंबित प्रस्तावांवर कार्यवाही करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सचिवांना, आयुक्तांना दिले आहेत.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, गोरगरीब रुग्णांसाठी आशेचे किरण असलेल्या ‘स्वाराती’ रुग्णालयाला गेल्या काही महिन्यांपासून घरघर लागली आहे. रुग्णालयातील सोनोग्राफी, सिटीस्कॅन, डायलिसिस वारंवार बंद असल्याने याचा त्रास सर्वसामान्य रुग्णांना होत आहे. त्यासोबतच रुग्णालयात असणारी यंत्रसामग्री सुव्यवस्थित चालवण्यासाठी अपुरे तंत्रज्ञ आणि रिक्त कर्मचाऱ्यांची पदे यामुळे ‘स्वाराती’ च्या रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. या समस्या घेऊन माजी आमदार संजय दौंड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष राजेश्वर चव्हाण, परळी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गोविंद देशमुख, शिवाजी सिरसाट यांच्यासह ‘स्वाराती’ चे अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मंत्रालयाच्या दालनात रितसर भेट घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव, आयुक्त आणि अधिकारी उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे दिले आदेश
मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘स्वाराती’ च्या समस्या जाणून घेत त्यावर सविस्तर अशी चर्चा केली. रुग्णालयात अन्य नवीन विभाग सुरू करण्यासाठी तसेच सिटीस्कॅन, डायलिसिस, सोनोग्राफी यासह अन्य सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी आणि अपुरे तंत्रज्ञ, रिक्त कर्मचाऱ्यांची पदे तात्काळ भरण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सचिव, आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात ‘स्वाराती’ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या समस्या कमी होतील आणि गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.