टीम AM : भाजपचे ज्येष्ठ नेते काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात उद्या सायंकाळी सहा वाजता हा शपथग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मोदी यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला, यावेळी राष्ट्रपतींनी त्यांना सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांनीही काल राष्ट्रपतींची भेट घेऊन, नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षनेतेपदी निवड झाल्याचं, तसंच त्यांना सर्व घटक पक्षांचा पाठिंबा असल्याचं पत्र सादर केलं.
काल राष्ट्रीय लोकशाही आघाडी – ‘एनडीए’ च्या बैठकीत सर्वानुमते नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, तेलगूदेशम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, जनसेना प्रमुख पवन कल्याण, अपना दलच्या अनुप्रिया पटेल आणि धर्मनिर्पेक्ष जनता दल नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी मोदींच्या नावाला पाठिंबा दर्शवला.
यावेळी बोलतांना मोदी यांनी, ‘एनडीए’ फक्त राजकीय पक्षांचा गट नाही तर राष्ट्र प्रथम या तत्वानं एकत्रित आलेला कटीबद्ध समूह असल्याचं प्रतिपादन केलं. सुशासन, विकास, जीवनमान दर्जा उंचावणं आणि नागरिकांच्या जीवनात किमान हस्तक्षेप याला सरकारचं प्राधान्य असेल, असं मोदी म्हणाले.
दरम्यान, काल ‘एनडीए’ च्या बैठकीनंतर मोदी यांनी, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी तसंच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.