मोदींची सभाही झाली पण…अंबाजोगाईकरांनी दिली सोनवणेंना मतांची आघाडी

टीम AM : बीड लोकसभेची निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. शेवटपर्यंत बीड जिल्ह्यातील जनता निकालाची आतुरतेने वाट पहात होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणेंचा विजय झाला तर महायुतीच्या पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभाही भाजपाने अंबाजोगाईत आयोजित केली होती. पण तरीही अंबाजोगाईकरांनी आपला कौल बजरंग सोनवणे यांंनाच दिला आहे. बजरंग सोनवणेंना अंबाजोगाई शहरातून 7652 मतांची आघाडी मिळाली आहे.

अंबाजोगाई शहरात 64 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. शहरातील एकूण 64,339 पैकी 39,441 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात बजरंग सोनवणे यांना सर्वाधिक म्हणजेच 20, 280 मते मिळाली. तर, पंकजा मुंडे यांना 12,628 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे 2631 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पिपाणी चिन्ह घेऊन निवडणूक लढणारे अपक्ष उमेदवार अशोक थोरात बीड जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर आहेत, मात्र अंबाजोगाईत त्यांना 1,945 मते मिळाल्याने ते चौथ्या क्रमांकावर गेले आहेत.

अंबाजोगाई शहरात पंकजा मुंडे यांच्यासाठी महायुतीच्या घटक पक्षांनी जोरदार प्रचार केला होता. गल्लोगल्ली जावून पंकजा मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. परंतू, अंबाजोगाईतील जनतेने मतांची आघाडी बजरंग सोनवणेंना दिली आहे. येणाऱ्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे अंबाजोगाईतील जनतेला आपल्या बाजूने वळविण्यासाठी महायुतीच्या घटक पक्षांना तगडी मेहनत घ्यावी लागणार आहे, हे मात्र निश्चित आहे.