टीम AM : ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचा जन्मदिन. त्यांचा जन्म. 31 मे 1945 रोजी कोल्हापूर येथे झाला. उमा यांचे मूळ व पूर्ण नाव अनुसूया साक्रीकर. उमा हे नाव त्यांना लता मंगेशकर यांनी दिले होते. सोज्वळ अभिनेत्री म्हणून उमा यांनी मराठी रसिक मनावर राज्य केले. कलेचा वारसा असलेल्या कुटुंबात उमा यांचा जन्म झाला. त्यांची आई रमादेवी कोल्हापूरला प्रभात कंपनीत, तर वडील श्रीकृष्ण साक्रीकर हे आचार्य अत्रे यांच्या कंपनीत होते.
कोल्हापूरला त्या काळात अनेक मेळे होत. या मेळ्यांतून उमा यांना संधी मिळाली. या काळात त्यांनी मिरजकर यांच्याकडे कथक आणि भरतनाट्यमचे शिक्षण घेतले. काही नाटकांमधूनही कामे केली. भालजी पेंढारकर यांच्या ‘आकाशगंगा’ या चित्रपटातील छोट्या सीतेच्या भूमिकेपासून त्यांच्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात झाली. ‘थोरातांची कमळा’ या चित्रपटात त्यांनी प्रथमच नायिकेची भूमिका केली. त्यानंतर नायिका म्हणून त्यांनी सुमारे 15 वर्षे काम केले.
‘मधुचंद्र’, ‘आम्ही जातो आमुच्या गावा’, ‘अंगाई’ ‘काका मला वाचवा’, ‘शेवटचा मालुसरा’, ‘मल्हारी मार्तंड’, ‘स्वयंवर झाले सीतेचे’, ‘भालू’ असे 80 हून अधिक चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. अभिनेते – दिग्दर्शक प्रकाश भेंडे हे त्यांचे पती. लग्नानंतर प्रकाश भेंडे यांनी सुरू केलेल्या श्री प्रसाद चित्र या संस्थेच्या माध्यमातून ‘भालू’, ‘चटक चांदणी’, ‘आपण यांना पाहिलंत का’, ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’, ‘आई थोर तुझे उपकार’ या चित्रपटांची त्यांनी निर्मिती व चित्रपटांमधून त्यांनी काम केले.
‘आई थोर तुझे उपकार’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. ‘मधुचंद्र’, ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ मधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. यातील गाणीही लोकप्रिय झाली. ‘दोस्ती’ या हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका केली. या चित्रपटातील ‘गुडिया हमसे रुठी रहोगी’ हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणेही रसिकांच्या ओठांवर आजही रेंगाळते.
उमा यांचा ‘भालू’ हा चित्रपटही खूप गाजला. त्यांनी 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्याशिवाय भोजपुरी आणि तेलुगू चित्रपटांमध्येही त्यांना काम करण्याची संधी मिळाली. पी. सावळाराम गंगा – जमुना पुरस्कार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा व्ही. शांताराम पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. उमा भेंडे यांचं 19 जुलै 2017 रोजी निधन झाले. त्यांना अभिवादन.
शब्दांकन : संजीव वेलणकर