अंबाजोगाई‌त वादळी वाऱ्याचा तडाखा : जनजीवन विस्कळीत, पुस येथे कारवर कमान कोसळली 

टीम AM : अंबाजोगाई शहरासह तालुक्यात रविवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. दुपारी 4 नंतर सायंकाळी 6 वाजेपर्यंत पुस, गिरवली, घाटनांदूर या परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत अतोनात नुकसान झाले. विशेषत: ऐन दुपारी दाटून आलेल्या ढगांनी काळोख केल्यानंतर दाखल पावसात ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला. अनेक ठिकाणी झाडे, विद्युत खांब कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, शहरात जवळपास चार ते पाच घंटे विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

अंबाजोगाई शहरात झालेल्या वादळी पावसामुळे योगेश्वरी महाविद्यालयाजवळ असणारा एक मोठा वृक्ष रस्त्यालगत असलेल्या खांबावर कोसळला. त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरीलही एक वृक्ष कोसळल्याची माहिती आहे. मोरेवाडी परिसरातील तसेच रमाई चौकातीलही काही वृक्ष रस्त्यावर उन्मळून पडले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने शर्थीचे प्रयत्न करीत रस्त्यावरील वृक्ष बाजूला सारीत वाहतूकीसाठी रस्ता खुला करुन दिला. सुदैवाने या सर्व घटनेत कोणतेही जिवीत हानी झाली नाही.

पुस येथे कारवर कोसळली कमान

अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथे आज झालेल्या वादळी पावसात ग्रामदेवता पद्मावती देवीची प्रवेश कमान एका कारवर कोसळली. या घटनेत पुर्ण कार चपटी झाली असून ती कार तेलंगणा राज्यातील आहे. कारमधील प्रवासी चहा पिण्यासाठी पुस येथे एका हॉटेलात थांबले होते, त्याच दरम्यान कमान कारवर कोसळली. दरम्यान, कारचं मोठं नुकसान झालं आहे.