‘स्वाराती’ ची सिटी स्कॅन मशीन बंदच : गोरगरिब रुग्णांचे होतायत हाल, लोकप्रतिनिधींचा निवेदनांचा खेळ 

टीम AM : गोरगरिब रुग्णांसाठी आशेचा किरण असलेल्या ‘स्वाराती’ रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन गेल्या पाच महिन्यांपासून बंद असल्याने त्याचा त्रास मात्र रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे. अंबाजोगाई शहरातील खाजगी सिटी स्कॅनचे दर गोरगरीब रुग्णांना परवडत नसल्याने त्यांना परळी येथील उपजिल्हा रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे रुग्णांना आजारासोबत मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. दुसरीकडे अंबाजोगाईतील तथाकथित लोकप्रतिनिधी केवळ निवेदनांचा खेळ खेळत असून फक्त निवेदन देऊन जबाबदारी झटकण्याचे काम करीत आहेत. त्यांना गोरगरीब रुग्णांच्या वेदनेची जाणीव होताना दिसून येत नाही. ‘स्वाराती’ रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन तात्काळ दुरुस्त करून रुग्णांसाठी उपलब्ध करावी, अशी मागणी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. 

‘स्वाराती’ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या रेडियोलॉजी विभागांतील सिटी स्कॅन मशीन गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहे. रुग्णालयाने शासनदरबारी अनेकदा प्रस्ताव पाठवून देखील त्याचा काही उपयोग होताना दिसून येत नाही. केवळ दुरुस्ती अभावी सिटी स्कॅन मशीन धूळ खात पडल्याने रुग्णांना एक तर जास्त पैसे देऊन खाजगीतून सिटी स्कॅन करून घ्यावे लागत आहे नाही तर परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन सिटी स्कॅन करून परत वापस यावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांची आणि नातेवाईकांची चांगलीच तारांबळ होते आहे. 

‘स्वाराती’ रुग्णालयाच्या रेडियोलॉजी विभागात 12 वर्षापूर्वी ‘फिलिप्स’ कंपनीची सिटी स्कॅन मशीन बसवली आहे. गेल्या 12 वर्षांपासून या मशीनने अहोरात्र सेवा दिली आहे. कोरोना काळातही ही मशीन रात्रंदिवस रुग्णांसाठी सुरू होती. परंतू, गेल्या पाच महिन्यापुर्वी या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही मशीन बंद पडली आहे. मशीन दुरुस्तीसाठी ‘स्वाराती’ रुग्णालय वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करित आहे. 

जिल्हाधिकारी मुधोळ यांनी दिले 80 लाख

‘स्वाराती’ रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत, ही माहिती जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंडे यांना समजतात त्यांनी तात्काळ मशीन दुरुस्तीसाठी 80 लाख रुपयांचा निधी ‘स्वाराती’  रुग्णालयाच्या प्रशासनास उपलब्ध करून दिला. परंतू, फिलिप्स कंपनीच्या टीमने अहोरात्र मेहनत करुनही मशीन दुरुस्त झाली नाही. 

दरम्यान, ‘स्वाराती’ रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन अजून किती काळ बंद राहणार आहे ? असा प्रश्न गोरगरिब जनतेला पडला असून तेही सिटी स्कॅन मशीन दुरुस्तीची वाट पाहत आहेत. दुसरीकडे ‘स्वाराती’ रुग्णालय प्रशासन मशीन दुरुस्तीसाठी अत्यंत संथ गतीने काम करीत असल्याने रुग्णांचे मात्र हाल होत आहेत. सिटी स्कॅन मशीन तात्काळ दुरुस्त करून रुग्णांसाठी उपलब्ध करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.