अंबाजोगाईकर उकाड्याने हैराण : ‘ही’ घ्या काळजी

टीम AM : गेल्या काही दिवसांपासून अंबाजोगाईत उन्हाचा तडाखा वाढला असून दुपारनंतर बाहेर फिरताना नागरिकांना घामाच्या धारा लागत आहेत. वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. उन्हामध्ये सतत काम केल्याने शरीरातील तापमान नियंत्रित करण्याच्या यंत्रणेत बिघाड होतो. परिणामी, शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे कोणत्याही सुरक्षेशिवाय उन्हामध्ये फिरल्यास उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

एप्रिल व मे महिन्यांमध्ये उष्णता वाढत असल्याने नागरिकांना उलटी, चक्कर, निर्जलीकरण, बेशुद्ध पडणे, उष्माघात असा त्रास होतो. मागील काही दिवसांपासून अंबाजोगाईत उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हामध्ये तापमान नियंत्रित ठेवणारी यंत्रणा शरीरात असते. या यंत्रणेचे कार्य विस्कळीत झाल्यास नागरिकांना उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यामध्ये शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणारी यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी सातत्याने पाणी पिणे आवश्यक असते. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी येत्या काळात अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

काळजी घेणे आवश्यक

मागील काही दिवसांपासून अंबाजोगाईत उकाडा वाढत आहे. वाढत्या उन्हामध्ये सातत्याने काम करणाऱ्या नागरिकांना डोकेदुखी, पोटात दुखणे, चक्कर येणे यासारखा त्रास होण्याची शक्यता आहे. अनेकदा शरीराचे निर्जलीकरणही होते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. दुपारच्या उन्हामध्ये घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी, डोळ्यावर गॉगल्स आदींचा वापर करावा. तसेच सोबत पाण्याची बाटली ठेवावी, सतत पाणी पिऊन शरीराचे तापमान नियंत्रित ठेवावे, पाण्याचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ खाण्यावर भर द्यावा. अधिकाधिक फळे खावी. त्यामुळे वाढत्या उन्हाचा फारसा त्रास होणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.