मोदींच्या हातात 10 वर्ष सत्ता असताना विकासासाठी काय केले ? : शरद पवारांचा सवाल

अंबाजोगाईत महाविकास आघाडीची विराट सभा : सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

टीम AM : पंतप्रधान नरेंद्र मोदी हल्ली महाराष्ट्रात फार फिरताहेत. अनेक ठिकाणी ते येऊन गेले. सबंध देशाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असताना आणि देशासमोर अनेक प्रश्न असताना ते सातत्याने महाराष्ट्रात येतायत. मोदींना एक गोष्ट लक्षात आली आहे की, लोकसभेच्या दोन टप्प्यातील निवडणुकीत त्यांना जनतेनी‌ नाकारले आहे. त्यामुळे धोका घ्यायला नको, म्हणून पुन्हा पुन्हा ते आपल्या राज्यामध्ये येत आहेत. पंतप्रधान येत असेल तर माझी तक्रार नाही. पण 10 वर्ष देशाची सत्ता त्यांच्या हातात होती, या 10 वर्षांत त्यांनी विकासासाठी काय पाऊलं टाकली ? आणि इथून पुढल्या काळामध्ये नक्की काय करणार आहेत ? हे त्यांनी सांगावं असा सवाल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित केला. अंबाजोगाई येथे दिनांक 9 मे‌ गुरुवार रोजी सायंकाळी मोंढा मैदानावर आयोजित विराट सभेत ‌पवार बोलत होते.

महाविकास आघाडीचे बीड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या विराट सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. रजनी पाटील, फौजिया खान, आ. राजेश टोपे, आ. संदीप क्षीरसागर, विजयराव गव्हाणे, जयसिंगराव गायकवाड, अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर, माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, माजी आमदार उषा दराडे, माजी आमदार सुनिल धांडे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, कॉ. बब्रुवाहन पोटभरे, मेहबूब शेख, सक्षणा सलगर, बबन गित्ते, दीपक केदार, माजी आमदार पृथ्वीराज साठे, नरेंद्र काळे, तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

सभेला संबोधित करताना शरद पवार पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही खात्री झालेली आहे की, या देशामध्ये त्यांनी काहीही सांगितलं तरी या देशातील जनता त्यांच्या हातात सत्ता देणार नाही. त्यासाठी ते टीका टिप्पणी करत आहेत, इतर ठिकाणी लोकांचे लक्ष विचलित करत आहेत, हाच एक कलमी कार्यक्रम ते करत आहेत. ते अंबाजोगाई या ठिकाणी येऊन गेले, त्यातून इथले प्रश्न सुटणार नाहीत, हे तुम्हाला आणि आम्हाला माहिती आहे, आणि म्हणून आता आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. आम्ही देशातल्या सर्व विरोधी पक्षातल्या लोकांना एकत्र करत आहोत. त्यांच्या सामूहिक शक्तीच्या जोरावर लोकांसमोर पर्याय देत आहोत. मी तुम्हाला खात्री देऊ शकतो की, ही जी एकी आम्ही विरोधकांची करतोय, ती नवा भारत बनवण्याच्या दृष्टीने जे काही करावं लागेल, ते करण्यासाठी ठोस पाऊलं टाकणारी एक नेतृत्वाची फळी देशासमोर या निवडणुकीनंतर तुम्हा लोकांच्या पाठीमागे पाहायला मिळेल, याची खात्री मी या ठिकाणी देतो. हे करण्यासाठी बीडकरांनी एकच काम करावं. त्यांनी बजरंग सोनवणेंसारखा एक उत्तम, सेवाभावी आणि कष्टकऱ्यांबद्दल आस्था असणारा खासदार मोठ्या मतांनी निवडून द्यावा, हीच विनंती मला या ठिकाणी करायची आहे. आज हा जिल्हा दारिद्र्यामध्ये व दुष्काळामध्ये आहे. हे सगळे प्रश्न सोडवायचे असतील तर जो काम करतो, जो उत्तम काम करतो त्याला निवडून देणे गरजेचे आहे. ज्यांनी 2 हजार 700 रुपये जिल्ह्यात सर्वात जास्त भाव दिला, अशा माणसाला तुम्ही मोठ्या मतांनी विजयी करा. त्यांची खूण ही आपल्या सर्वांना माहीत आहे, तुतारी वाजवणारा माणूस या पुढचं बटण दाबा आणि एक नवीन इतिहास या ठिकाणी निर्माण करा, असं आवाहनही शरद पवार यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.

देशातील प्रत्येक नागरिकांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर : जयंत पाटील 

राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने मराठा तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. पंतप्रधान  राज्यात येऊन विकासावर बोलण्यापेक्षा इतर गोष्टीवरचं जास्त बोलतात. ठराविक लोकांसाठीच काम करून ठराविक लोकांनाच श्रीमंत करण्याचे काम नरेंद्र मोदी करत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी यावेळी केला. देशात महागाई वाढवणे, देशातील प्रत्येक नागरिकांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करण्याचे काम मोदी सरकार करत असल्याचे त्यांनी नमूद केले. बीड जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी एक शेतकरी कुटुंबातील सामान्य उमेदवार बजरंग सोनवणे यांना निवडून देण्याचे आवाहन बीड जिल्ह्यातील मतदारांना त्यांनी केले राज्यात 32 ते 35 खासदार इंडिया आघाडीचे निवडून येतील असे चित्र राज्यातील निवडणुकीवरून दिसून येत असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी आवर्जून सांगितले. भाजपने ‘ईडी’ ची भीती दाखवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, याबाबत आपणास आनंदच झाला. कारण पक्ष सोडून गेल्यानंतर माझा पक्ष स्वच्छ केला असल्याची मिश्कील टिप्पणी यावेळी पाटील यांनी केली. 

देश फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळला : अनिल देशमुख

राज्यात सर्वत्र बदलाचे वारे वाहताना दिसत असल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. देश फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळला असून नागरिक यावर आता उघडपणे बोलत असल्याचे अनिल देशमुख यांनी नमूद केले. या सरकारने कापूस, सोयाबीन यांचे भाव कमी करून येथील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असल्याची भावना देशमुख यांनी याप्रसंगी व्यक्त केली. यावेळी अनिल देशमुख यांनी ‘लावरे तो व्हिडिओ’ म्हणत मोदींचे भाषणं स्क्रीनवर दाखवित त्यांची चांगलीच पोलखोल केली. यावेळी उपस्थितांनीही त्यांना चांगला प्रतिसाद दिला. 

भाजपमध्ये नीतिमत्ता शिल्लक राहिली नाही : राजेश टोपे

अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांची भारतीय जनता पार्टी आणि आजची भाजपा यात खुप मोठा फरक असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. आजच्या भाजपमध्ये नीतिमत्ता शिल्लक राहिली नसुन तिला फोडाफोडी करण्यात जास्त रस असल्याचेही टोपे यांनी नमूद केले. राजकारणातील मूल्य नष्ट होत आहेत. तत्वशून्य राजकारण आज पहावयास मिळत असल्याबाबत यावेळी राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली. मोदींच्या गॅरंटीची एक्सपायरी डेट जवळ आली असून तिचा करिष्मा जननेतून  उतरला असल्याचेही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले. 

बीड जिल्ह्यात खालच्या पातळीवर राजकारण : बजरंग सोनवणे

बीड जिल्ह्यात सध्या खालच्या पातळीवर राजकारण चालू असल्याची खंत बीड लोकसभचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केली. नाहक खोटेनाटे आरोप करून माझी प्रतिमा मलिन केली जात असल्याचे देखील त्यांनी नमुद केले. खोट्या भूलथापांची प्रलोभने नागरिकांना धनंजय मुंडे व भाजपच्या वतीने दिली जात असल्याने अशा भूलथापांना बळी न पडण्याच आवाहन बजरंग सोनवणे यांनी केले. मागील खासदारांनी विकास तर केलाच नाही पण विकासकामांसाठी दिलेला निधी देखील परत गेल्याची नामुष्की त्यांच्यावर आली होती. यावरून गेली 10 वर्षे खासदारांनी किती कर्तबगारीने काम केले आहे हे स्पष्ट होत असून यापुढे जिल्ह्याच्या विकासासाठी एक सामान्य शेतकरी पुत्राला देशाच्या संसदेत पाठवण्याची विनंती यावेळी बजरंग सोनवणे यांनी केली. 

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या विराट सभेला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात तरुणांची आणि महिलांची संख्या लक्षणीय होती. सभा‌ संपेपर्यंत विराट जनसमुदाय नेत्यांचे भाषणं ऐकण्यासाठी हजर होता. सभेत काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. सभेदरम्यान ‘रामकृष्ण हरी’ – ‘वाजवा तुतारी’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.