मोदींच्या धोरणामुळे देश देशोधडीला लागला : प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरांची ‘रेकॉर्ड ब्रेक’ सभा : सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद 

टीम AM : देशात नरेंद्र मोदींच्या 10 वर्षांच्या कालखंडात 74 हजार शेतकरी आणि शेतमजुरांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांना कुठलीही मदत मोदी सरकारकडून मिळाली नाही. देशात अघोषित आणिबाणी लादली गेली असून सर्वसामान्य माणसांच जगणं मुश्कील झाले आहे. मोदींच्या धोरणामुळे देश देशोधडीला लागला आहे, अशी जोरदार टीका वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अशोक हिंगे यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांच्या जाहीर सभेचे आयोजन शहरातील मोंढा मैदानावर शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले होते. त्या सभेत आंबेडकर बोलत होते. यावेळी सभेच्या मंचावर उमेदवार अशोक हिंगे, परभणी लोकसभेचे उमेदवार पंजाबराव डख, प्रा. विष्णू जाधव, जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, अनिल डोंगरे, तालुकाध्यक्ष खाजामिया पठाण, गोविंद मस्के, बिबीशन चाटे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

सभेला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मोदींनी त्यांच्या काळात उद्योग धार्जिणे धोरणं राबविले. त्यामुळे देशातील बहुतांश कंपन्या खाजगी मालकांच्या ताब्यात गेल्या असून तरुणांच्या हाताला कुठलेही काम राहिले नाही. उलट मोफत इंटरनेट सेवा देऊन तरुणांचं भवितव्य धोक्यात घातले आहे. शिक्षणात, नोकरीत सगळीकडेच खाजगीकरण होत असल्याने देशातील युवकांना मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर ‌मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाईने उच्चांक गाठला आहे. गॅस, लोखंड, सिमेंट जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले असून यात सर्वसामान्य माणूस होरपळून निघत आहे, अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली.

पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, देशातील निवडणूक ही निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली आहे. वंचित बहुजन आघाडीने नेहमी सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून राजकारण केले आहे. त्यामुळेच आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत सर्व समाजाला न्याय देत त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. दुसरीकडे देशातील प्रस्थापित राजकीय पक्षांनी मगं ते भाजप असो की कॉंग्रेस त्यांनी फक्त घराणेशाहीचीचं पाठराखण केली आहे. या घराणेशाहीला उलथवून टाकण्यासाठी तुम्हाला वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी लागेल, असं आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले. तसेच देशातील सर्व घटनात्मक संस्थांवर मोदींनी पकड बसविली असून ‘ईडी’ आणि इतर संस्थांचा वापर राजकीय नेत्यांना‌ आणि उद्योगपतींना भयभीत करण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे देश आता हुकूमशाहीकडे वाटचाल करताना दिसत आहे. ही हुकुमशाही मोडीत काढायची असेल तर आपल्याला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे लागणार आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

बीड लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीने अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे साखर कारखानदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ज्यांनी निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केला आहे.‌ त्यामुळे ते यापुढेही कधी गट बदलतील ते सांगता येत नाही. राजकारणात नितीमत्ता आणि एकनिष्ठता महत्वाची असते तरचं लोकं नेतृत्वावर विश्वास ठेवतात. अशोक हिंगे हे अभ्यासून नेतृत्व असून गेल्या कित्येक वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय आहेत. मराठा आरक्षण असो की, सामान्य माणसांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे‌ आणि जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी ते निश्चितच प्राधान्य देतील.‌ त्यामुळे येणाऱ्या 13 तारखेला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांच्या गॅस सिलिंडर या बटनावर बोट दाबून भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

बीड जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार : अशोक हिंगे

बीड लोकसभेच्या निवडणुकीत पुढील दोन्ही उमेदवार कारखानदार आहेत. त्यामुळे ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. मुंडे घराण्याकडे 10 वर्ष सत्तेच्या चाव्या होत्या. त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काय‌ केले ? असा सवाल हिंगे यांनी यावेळी उपस्थित केला. महाविकास आघाडीचा उमेदवार हा डमी उमेदवार असून आमची लढत थेट भाजपाशी आहे. मी जातीपातीच्या आधारावर मत मागणार नसून विकासाच्या मुद्यावर मत मागणार आहे. बीड जिल्ह्यातील प्रस्तावित रेल्वे मार्ग पुर्ण करण्यासाठी तसेच जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण मला लोकसभेत जाण्याची संधी द्यावी. लोकसभेत शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या हितासाठी काम करेन, अशी ग्वाही देत अशोक हिंगे पाटील यांनी मतदारांना मोठ्या संख्येने विजयी करण्याचे आवाहन केले.

प्रकाश आंबेडकरांची ‘रेकॉर्ड ब्रेक’ सभा

वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा शहरातील मोंढा मैदानावर शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. ही सभा ‘रेकॉर्ड ब्रेक’ झाली. सभेला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. संपूर्ण मोंढा मैदान गर्दीने व्यापून गेले होते. ग्रामीण भागातून कानाकोपऱ्यातून प्रकाश आंबेडकर यांना ऐकण्यासाठी सामान्य मतदार हजर राहिला होता. यात महिलांची‌ आणि तरुणांची संख्या लक्षणीय होती. सभेला पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. तसेच समता दलाचे सैनिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.