टीम AM : लोकसभा निवडणुकीच्या काळात माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीमध्ये सदस्य असणाऱ्या सायबर विभागाच्या मार्फत जिल्हयातील शेकडो अकाऊंट दररोज तपासले जात आहेत. निवडणूक आचारसंहिता घोषित झाल्यापासून सोशल मीडिया अकांऊट तपासण्यात येत आहेत. प्रत्येक अकांऊटवर लक्ष असून नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
समाज माध्यमे सर्वांच्या हाती असून याचा दुरुपयोग होता कामा नये. एखादी तथ्यहीन बातमी वाऱ्यासारखी पसरविणाचे सामर्थ्य समाजमाध्यमात आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप व तत्सम प्रसार माध्यमांचा वापर करताना आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याने दक्षता बाळगणे आवश्यक आहे. ग्रुप ॲडमिनने याबाबत विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन ‘एमसीएमसी’ च्या वतीने करण्यात आले आहे.
उमेदवारांसाठी सूचना
सर्व उमेदवारांना स्वतः च्या समाज माध्यमांची अधिकृत खाती (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम ब्लॉग,) निवडणूक आयोगाकडे नोंद करणे आवश्यक आहे. निवडणूक काळात सर्व समाजमाध्यम प्रतिनिधींनी आपल्या माध्यमांची नोंद आयोगाकडे करावी. समाजमाध्यमांवरुन अफवा पसरविणे, जाती – जातीमध्ये तेढ निर्माण करणे, भीतीदायक, दहशत निर्माण होणाऱ्या पोस्ट, परवानगी न घेता टाकलेल्या जाहिराती, याबाबत गंभीर गुन्ह्याची नोंद होवू शकते. त्यामुळे निवडणुकीतील उमेदवारांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
सामान्यांसाठी सूचना
निवडणूक काळामध्ये आपल्या समाजमाध्यम खात्यावरुन आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. जातीय मुद्दयावर प्रचाराच्या पोस्ट टाकणे, धर्म, जात, पात, भाषा या मुद्यावरुन तेढ निर्माण होणाऱ्या पोस्ट प्रसारित न करणे. तथ्यहीन बातम्या प्रसारित करणे टाळावे, अशी निवडणूक आयोगाची सूचना आहे. 39 बीड लोकसभा मतदारसंघात अशा घटना आढळल्यास 8788998499 या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सॲपद्वारे कळविण्यात यावे, भ्रामक पोस्ट पसरवणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी दिपा मुधोळ – मुंडे यांनी कळविले आहे.