टीम AM : समीर गांगुली दिग्दर्शित ‘शर्मिली’ हा हिंदी चित्रपट 25 एप्रिल 1971 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात राखी यांची दुहेरी भूमिका होती. कॅ. अजित कपूर (शशी कपूर) लष्करी तळावरून परतत असताना एका पार्टीत त्याची कामिनीशी (राखी) ओळख होते. घरी परतल्यावर त्याचे पालनकर्ते जोजफ (नाझिर हुसेन) त्याला लग्न करण्याचा आग्रह करून मुलगी दाखवायला नेतात. तिचे नाव कंचन (राखी). तिला पाहून अजित चांगलाच चक्रावतो, कारण तो जिला भेटलेला असतो ती हीच तरुणी असते. तो लग्नाला संमती देतो. लग्नाची तयारी चालू असतानाच अजितला कळतं की जिला आपण भेटलो ती ही नव्हे तर तिची जुळी बहीण आहे.
कंचन दु:खी होते पण आपल्या बहिणीच्या सुखाचा विचार करते. कथा नंतर वेगळं वळण घेते. गीतकार नीरज आणि संगीतकार एस. डी. बर्मन या सदाबहार गाणी देणाऱ्या जोडीची या चित्रपटातील सर्वच गाणी अतिशय लोकप्रिय झाली होती. आजही या चित्रपटाचं शीर्षक गीत ‘ओ मेरी शर्मिली’ हे गाणं गाताना किशोरकुमारने आपल्या खास शैलीत गाऊन एकच धमाल उडवून दिली होती. यातील इतर गाणीही तेवढीच गाजली होती.
किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले या ताकदीच्या गायकांनी ही गाणी गायली होती. विशेषत: बिनाका गीतमाला या कार्यक्रमात ‘ओ मेरी शर्मिली’ हे गाण नंबर वन सरताज ठरलं होतं. 1971 सालातील ‘बिनाका गीतमाला’ च्या 100 गाण्यांमध्ये ‘शर्मिली’ चित्रपटातील गाण्यांचा तेव्हा समावेश करण्यात आला होता. ‘खिलते है ये गुल यंहा’, ‘ओह मेरी शर्मिली’ ही गाणी आजही अनेकांच्या प्ले – लिस्टचा भाग आहेत. प्रसिद्ध लेखक गुलशन नंदा हे शर्मिली चित्रपटाचे लेखक होते. या चित्रपटामध्ये शशी कपूर, नरेंद्र नाथ, नाझिर हुसैन, इफ्तेखार, एस. एन. बॅनर्जी, अनिता गुहा आणि अतिफ सेन यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या शशी कपूर आणि दुहेरी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री राखीची समीक्षकांनी तर प्रशंसा केलीच होती पण व्यावसायिक दृष्ट्याही ते यशस्वी ठरले होते. भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘शर्मिली’ चित्रपट हिट ठरला होता. ‘बॉक्स ऑफीस इंडिया’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार चित्रपटाने जवळपास 2, 60, 00000 रुपये इतकी कमाई केली होती.
– अनिल रा. तोरणे