टीम AM : अंबाजोगाई शहरात सध्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे. घरफोडी, दुकान फोडीनंतर अंबाजोगाई बस स्थानकात खिसे कापू महिलांची टोळी सक्रिय झाली आहे. विवाह कार्यक्रमाहून लातूरला परत जाण्यास निघालेल्या एका महिलेच्या पर्समधील डब्यात ठेवलेले 1 लाख 75 हजार रुपये किमतीचे सोने – चांदीचे दागिने खिसेकापूने लंपास केल्याची घटना रविवारी दि. 21 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी 23 एप्रिल रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीमा सुग्रीव इंगळे या महिला लातूर येथे महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयात नोकरीस आहेत. 21 एप्रिल रोजी त्या स्वतः, आई आणि बहीण अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथे विवाह कार्यक्रमासाठी आल्या होत्या. कार्यक्रम आटोपून लातूरला जाण्यासाठी अंबाजोगाई बस स्थानकावर आल्या असता बसस्थानकातील एका अनोळखी महिलेने अंगावर दागिने ठेवू नका. बॅगेमध्ये ठेवा. येथे खूप चोर आहेत, असे सांगितले. अनोळखी महिलेवर विश्वास ठेवून सीमा इंगळे यांनी तिघींचेही गळ्यातील दागिने काढून एका स्टीलच्या डब्यात ठेवले. तो डबा पर्समध्ये ठेवला. त्यानंतर लातूरला जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना दोन महिलांनी त्यांच्या पर्समधोल डबा ब त्यातील 1 लाख 75 हजार रुपयांचे सोने – चांदीचे दागिने चोरले, असे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात सीमा सुग्रीव इंगळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निगराणीसाठी पोलिस हवेत
अंबाजोगाई बसस्थानकात सातत्याने अशा चोरीच्या घटना घडत आहेत. छोटमोठ्या चोर्यांत नागरिक तक्रार देण्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, आता लाखो रूपयांची दागिनेही लंपास होऊ लागल्याने बसस्थानकात निगराणीसाठी पोलिस तैनात करण्याची मागणी नागरिक करत आहेत. याशिवाय या चोरांच्या टोळीचा पर्दाफाश करण्याची गरज आहे.