बीड जिल्ह्याची सेवा करण्याची संधी द्यावी – पंकजा मुंडे
टीम AM : भाजपच्या बीडमधील लोकसभा उमेदवार पंकजा मुंडेंनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत भाऊ धनंजय मुंडे आणि खा. प्रितम मुंडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, राज्य पातळीवरचा एकही बडा नेता अर्ज भरतेवेळी उपस्थित नव्हता.
अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडेंनी घरी पूजा केली. त्यानंतर आईचे आशीर्वाद घेतल्यानंतर मुंडे भगिनींनी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगांची विधीवत पुजा केली आणि दर्शन घेतलं. तसंच गोपीनाथ गडावर जाऊन, गोपीनाथ मुंडेंच्या समाधीपुढे त्या नतमस्तक झाल्या. अर्ज भरल्यानंतर पंकजांनी मोठी रॅली काढत शक्तिप्रदर्शन केलं. पंकजा मुंडेंचा फॉर्म भरताना त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आर्यमन देखील उपस्थित होता. बीडमध्ये पंकजा यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे निवडणूक लढवत आहेत.
फॉर्म भरण्याअगोदर पंकजा मुंडे भावुक झाल्या होत्या. या विषयी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मला शब्दात हे वर्णन करता येणार नाही. ज्या जागेवर मुंडेसाहेब होते. त्या जागेवर जाण्याचा योग लोकांच्या आशिर्वादाने मिळणर आहे. माझा परिवार मोठा आहे. एक दोन व्यक्ती माझा परिवार नाही. प्रत्येक चौकातील, रस्त्यावरील गर्दी माझा परिवार आहे. मी भावनिक यासाठी झाले कारण माझी आई तिथे आली होती. मुंडे साहेबांची जागा घेतली असे म्हटले तर लहान तोंडी मोठा घास होईल.. पण त्यांची कमी कधी जाणवणार नाही हा प्रयत्न मी केला आहे. त्यांची जी गोष्ट अपूर्ण राहिली ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करत आहे. या बीड जिल्ह्याची सेवा करण्याची संधी मला मतदारांनी द्यावी, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.



