टीम AM : परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील गाणी सुपरहिट झाली आहेत. ‘नाच गं घुमा’, ‘गडबडगीत’ ही गाणी सध्या ट्रेडिंगला आहेत. त्यामुळे या गाण्यांवर कलाकार मंडळींसह नेटकरी भन्नाट व्हिडीओ करताना दिसत आहेत.
अभिनेत्री मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते, सारंग साठ्ये असे तगडे कलाकार मंडळी असलेला ‘नाच गं घुमा’ चित्रपट 1 मेला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरसह प्रसाद ओक, मंजिरी ओक यांनी ‘नाच गं घुमा’ चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी भन्नाट डान्स व्हिडीओ केला आहे, जो चांगलाच व्हायरल झाला आहे.
प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अमृता खानविलकरसह प्रसाद, मंजिरी दिसत आहेत. तसेच व्हिडीओत, प्रसादचा मजेशीर अंदाज पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिघांनी ‘नाच गं घुमा’ च्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
अमृता, प्रसाद, मंजिरीच्या या व्हिडीओवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री हेमल इंगळे, स्वप्नील जोशी, पल्लवी पाटील, मधुगंधा कुलकर्णी या कलाकारांनी व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘मस्त’, ‘अरे काय भारी केलंय’, ‘वॉव’ अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी लिहिल्या आहेत.
दरम्यान, ‘नाच गं घुमा’ हे गाणं अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायलं आहे. तसंच हे गाणं परेश मोकाक्षी यांनी लिहिलं आहे. या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरेनं केलं आहे.