ख्यातनाम लोककला संशोधक डॉ. गणेश चंदनशिवे यांचे राष्ट्रीय नाट्य विद्यालयात (NSD) तमाशा प्रशिक्षण

टीम AM : आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त लोककला संशोधक तथा मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीचे प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे हे भारतातील नाट्यशास्त्राचे प्रशिक्षण देणारी सर्वोच्च संस्था अर्थातच दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील (NSD) विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा अस्सल रांगडा तमाशा शिकवणार आहेत.

आज पारंपारिक तमाशाला कधी दुष्काळाचा सामना करावा लागतो तर कधी पावसाच्या सावटाचा, कधी यात्रा – जत्रातील परवानगीचा तर कधी आचारसंहितेचा. अशा प्रतिकूल परिस्थितीतही तमाशा टिकून आहे, आपले पारंपारिक अस्तित्व घेऊन. अशा प्रतिकूल परिस्थितीत भारतातील इतर लोककलावंत आपल्या राज्यातील लोककला इतर राज्यात पोहचवण्यासाठी धडपडत आहेत. जसा गुजरातचा भवाई, उत्तर प्रदेशची नौटंकी, ओरिसाचा छाऊ, प. बंगालचा बाऊल, छत्तीसगडची पांडवणी तशीच  महाराष्ट्राची अस्सल रांगडी लोककला तमाशा. आता महिनाभर या भारतभरातील मुलांना तमाशाचा इतिहास, त्याची जडणघडण, त्यातील कलावंतांचे योगदान, त्यातील घटक, तमाशाचे पूर्ववैभव, आजच्या काळातील तमाशाची अवस्था आणि त्याचे सादरीकरण याचे प्रशिक्षण डॉ. गणेश चंदनशिवे अमराठी मुलांना देणार आहेत. सोबत हार्मोनियमसाठी राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ हार्मोनियम वादक सुभाष खरोटे, ढोलकीसाठी उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार प्राप्त विकास कोकाटे आणि नृत्य दिग्दर्शनासाठी डॉ. सुखदा खैरे असणार आहेत.

तमाशा प्रशिक्षण शिबिरात महाराष्ट्रातील तमाशाचे पारंपारिक स्वरुप जोपासण्यासाठी नव्या पिढीतील तरुण कलाकारांना तमाशाच्या पारंपारिक स्वरुपाबाबत मार्गदर्शन तसेच कलाकारांना   पोशाखाच्या मूळ पध्दती, लावणी, गायन, मूळ तमाशातील नृत्य प्रकार, ढोलकी, तुणतुणे, मंजिरा इ. विशिष्ट वाद्ये यासंबंधीचे प्रशिक्षण राष्ट्रीय नाटय विद्यालय, दिल्ली येथे आयोजित तमाशा प्रशिक्षण शिबिरात देण्यात येईल, अशी माहिती आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त लोककला प्रशिक्षक, नामवंत सिने पार्श्वगायक तथा मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीचे प्रमुख, डॉ. गणेश चंदनशिवे यांनी दिली.