राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीची 97.79 कोटींची मालमत्ता जप्त : ‘ईडी’ ची मोठी कारवाई

टीम AM : मुंबईतील अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरुवारी (दि.18) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत रिपू ​​सुदान कुंद्रा उर्फ ​​राज कुंद्रा यांच्या मालकीची 97.79 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावावर असेलल्या जुहू येथील निवासी फ्लॅट, पुण्यात असलेला निवासी बंगला आणि राज कुंद्राच्या नावावर इक्विटी शेअर्स अशा एकूण 97.79 कोटी मालमत्तेचा समावेश आहे.

महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलीस यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या अनेक एफआयआरच्या आधारावर ‘ईडी’ ने ही कारवाई केली आहे. ज्यामध्ये राज कुंद्रा यांच्यासह दिवंगत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाज यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. लोकांकडून बिटकॉइन्सच्या रूपात दरमहा दहा टक्के परतावा देण्याचे खोटं आश्वासन देऊन निधी गोळा केल्याचा आरोप यांच्यावर आहे.

तसेच राज कुंद्राकडून या गोळा करण्यात आलेल्या बिटकॉइन्सचा वापर खणकामासाठी केला जाणार होता. गुंतवणूकदारांना मोठा परतावा देण्याचं अमिषही दाखवण्यात आलं होतं. मात्र यातून राज कुंद्राने गुंतवणूकदारांची फसवणूक केली. अवैधरित्या मिळालेले बिटकॉइन्स लपवले. असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान या अगोदर देखील राज कुंद्रा याला 2021 मध्ये पॉर्नोग्राफी प्रकरणांमध्ये अटक झाली होती. काही दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याला जामीन मिळाला होता.