टीम AM : मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. याच अवकाळी पावसात वीज पडून आज दोघांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, मराठवाड्यातील छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात आज सलग दुसऱ्या दिवशी हट्टी, बहुली, अंभई, वडाळी तसंच घाटनांद्रा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. परिणामी अनेक ठिकाणी शेतात उभ्या असलेल्या कांदा तसंच इतर उन्हाळी पिकांचं नुकसान झालं.
पैठण तालुक्यातील टाकळी अंबड इथं वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी येथे एका महिलेचा वीज पडून मृत्यू झाला आहे. विहामांडवा परिसरातील वीज पडून दोन बैल दगावल्याचं वृत्त आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात आज दुपारी 10 ते 15 मिनिटे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा, गंगाखेड आणि परभणी तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पूर्णा तालुक्यातल्या लिमला, दस्तापुर, कमलापूर परिसरात काल झालेल्या गारपीटमध्ये हळद, ज्वारीसह भाजीपाला पिकांचं नुकसान झालं आहे.
नऊ जिल्ह्यांना अलर्टचा इशारा
राज्यात येत्या दोन दिवसात विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागानं कळवलं आहे. याकाळात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.